वांबोरी ग्रामीण रूग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना परिचारिकेची अरेरावी

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना व महिलांना तेथील परिचारिकेकडून अरेरावीची भाषा वापरल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली.

दरम्यान, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांबरोबर अरेरावी करणार्‍या त्या परिचारिकेची चांगलीच कानउघाडणी करीत तिला चांगलाच गावरान हिसका दाखविला.

वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये काल 26 मे रोजी सकाळी दहा वाजता वांबोरी ग्रामपंचायतीने लसीकरणाचा दुसरा डोस नागरिकांना देण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे नागरिकांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. साडेदहा वाजले होते. नागरिक या ठिकाणी दवाखान्यात विचारण्यासाठी जात असतानाच त्याठिकाणी एक परिचारिका लगेच दवाखान्याच्या पोर्चमध्ये आली व महिलांना विचारू लागली, दवाखान्यात घुसू नका, काय काम आहे. यावेळी महिला व पुरुष म्हणाले, आम्हाला लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे म्हणून आम्ही इथे आलो आहोत. यावेळी सिस्टरने बाहेर व्हा, अशा अर्वाच्च भाषेत या महिलांना व नागरिकांना खडसावले.

यावेळी एक महिला म्हणाली, या ठिकाणचे डॉक्टर अशी अरेरावीची भाषा कधीच वापरत नाही, तुम्ही का असे बोलता? अशी ही महिला बोलल्यानंतर या नर्सला अजून राग आला. आम्हाला त्यांचे काही घेणे देणे नाही. असे म्हटल्यावर मात्र, या ग्रामीण भागातील महिलांनी मागेपुढे न पाहाता त्या नर्सला चांगलेच फैलावर घेतले.

यावेळेस नर्सने सुद्धा आम्ही काय तुमचे नोकर नाहीत, सरकार आम्हाला पैसे देतो, तुम्ही जास्त बोलू नका. बाहेर गुपचूप बसून रहा. या भाषेत या महिलेला धमकी दिल्यामुळे या ठिकाणच्या असणारे नागरिक व महिला दवाखान्याच्या आवारात शांतपणे बसून राहिले. अशा उद्धट बोलणार्‍या नर्सवर प्रशासन काही कारवाई करणार का नाही? या नर्स महिलेला असेच पाठीशी घालणार? याविषयी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या महिलेने ही नर्स कोण आहे? याची चौकशी केली असता असे निदर्शनास आले की या नर्स आणि लसीकरण याचा काही संबंध नाही. ही नर्स ओपीडी बघत आहे. ओपीडी बघत असताना या नर्सचे अनेक आलेल्या पेशंटशी वादही झालेला आहे.

या परिचारिकेचे आणि या दवाखान्यात असणार्‍या कामगारांचेही पटत नसल्याचे समजते. अनेकवेळा नागरिकांनी डॉक्टरांकडे तक्रार सुद्धा केली आहे. परंतु डॉक्टरने या नर्सविषयी कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे दवाखाना वर्तुळात बोलले जात आहे. हा प्रकार घडत असताना या ठिकाणी नवीनच असणार्‍या डॉ. प्राजक्त मुथा उपस्थित होत्या. त्यांनी मात्र, यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *