Friday, April 26, 2024
Homeनगरवांबोरी चारीची पाईपलाईन फोडली

वांबोरी चारीची पाईपलाईन फोडली

करंजी (वार्ताहर) –

पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील 45 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील

- Advertisement -

करडवाडी नदीजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोडल्याने तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेला पाणी पुरवठा बंद झाला असून पाईप लाईन फोडल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तीविरोधात मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला 15 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर दोन दिवसापूर्वीच पाणी तिसगाव, मढी येथील पाझर तलावात पोहोचले; परंतु सोमवारी करडवाडी नदीजवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुख्य पाईपलाईन फोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी करडवाडी, शिरापूर नदीला वाहून गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग बंद झाल्याची माहिती समजल्यानंतर संबंधित पाईपलाईनची देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांनी तपास घेतला असता करवाडी नदीजवळ पाईपलाईन फोडण्यात आली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कर्मचार्‍यांनी शाखा अभियंता आंधळे यांना कळवले ते कालवा निरीक्षक पांडुरंग अरगडे, बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन घटनास्थळी येवून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्य पाईपलाईन पडल्याचे लक्षात आले त्यानंतर शाखा अभियंता आंधळे यांनी पाथर्डी पोलिसात फौजदारी स्वरूपाचा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.

शेतकर्‍यांनी मागणी केल्याबरोबर मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले आहे. चारच दिवसात पाणी तिसगावपर्यंत पोहोचले. सर्वांना पाणी मिळावे म्हणून अधिकारी, कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व लाभधारक पाझर तलावात पाणी पोहोचणार असून सर्वांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे कोणीही पाईपलाईन फोडून सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याला अडथळा आणू नये व चुकीचं काही कोणी करू नये, असे आवाहन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या