Thursday, April 25, 2024
Homeनगरवडगाव गुंड येथे साकारणार हरित बोगदा

वडगाव गुंड येथे साकारणार हरित बोगदा

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील वडगावगुंड येथील सुपात्या डोंगरावर येथील स्थानिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन वनराई प्रकल्प हाती घेतला आहे. येथे सुमारे 1 हजार 700 विविध रोपांची लागवड केली आहे. यामध्ये विविध 170 प्रजातींच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या रोपांना संरक्षणासाठी कुंपन लावण्यात आलेले आहे. पाण्याच्या सोयीसाठी येथे शेततळे तयार करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येत असून सुमारे 24 एकर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. याठिकाणी दुतर्फा वडाची घनदाट वृक्ष लागवड करून हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा हरित बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी झाले.

- Advertisement -

एका वर्षामध्ये येथील झाडांची चांगली वाढ झालेली असून दोन किलोमीटर लांबीची धावपट्टी येथे तयार करण्यात आली आहे. येथील सुपाई मातेचे छोटेशे मंदीर उभारणीलाही लोकसहभागातून सुरुवात करण्यात आली आहे. येथे वन्य प्राण्यांसाठी कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत. तर कमळ लागवडीसाठी याठिकाणी पाच छोटे तलाव निर्माण करून आता त्यामध्ये कमळ फुलले आहेत. येथील डोंगरावर सध्या कोल्हे, लांडगे, तरस, ससे, मुंगूस, हरिण व विविध पक्षी यांचे दर्शन नित्याचे झाले आहे. वन्यप्राणी हिंस्र असूनही ते आता चांगले माणसाळले आहेत.याठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होत असून व्यायाम, प्राणायाम व ध्यान धारणा केली जाते. या डोंगराची उंची सुमारे चारशे मिटर असल्यामुळे ट्रेकिंग साठी आता हे जवळचे ठिकाण तयार होत आहे.

या ठिकाणी डोंगराच्या पायथ्यापासून सुपाई माता मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. हे अंतर एक किलोमीटर असून या रस्त्याच्या दुतर्फा पन्नास फूट अंतरावर वडाची झाडे लावण्यात आली आहेत. दुतर्फा वडाची घनदाट वृक्ष लागवड करून हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा हरित बोगदा तयार करण्यात येणार आहे. यासाठी येथील लागवड केलेल्या वृक्षांच्या फांद्याच्या वाढीनुसार कटींग करून बोगद्याचा आकार देण्यात येणार आहे. या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.

पुढील दहा ते पंधरा वर्षांत तयार झालेला हा हरित बोगदा येथील प्रमुख आकर्षण असणार आहे. ही संकल्पना येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व लोकजागृती सामाजिक संस्थेने तयार केली आहे. येथील जागा ही शासकीय भूखंड असून येथे वृक्षारोपणासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली आहे. येथे आजपर्यंत झालेला खर्च लोकसहभागातून करण्यात आला आहे. ग्रीन टनेलचे भूमिपूजन सोमवारी घनश्याम बळप यांच्याहस्ते झाले. यावेळी बबनराव कवाद, रामदास घावटे, विलास थोपटे, शंकर गुंड, किरण गुंड, मंगेश गुंड प्रमोद लोढा, पांडुरंग थोरात, डॉ. सातपुते, गणेश लंके, बाबाजी गाडीलकर, भीमा लामखडे, सुधामती कवाद, विठ्ठल कवाद, बाळासाहेब लामखडे, वैभव गाडीलकर, श्रीधर गाडीलकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या