Friday, April 26, 2024
Homeनगरकर्जतला मतदान यंत्र सुरक्षेबाबत भाजपचा आक्षेप

कर्जतला मतदान यंत्र सुरक्षेबाबत भाजपचा आक्षेप

कर्जत |प्रतिनिधी| karjat

कर्जत नगरपंचायत निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबरला झाले. मतदान यंत्रात हे मतदान बंद झालेले आहे. मात्र भाजपाकडून या मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनावरील आमचा विश्वास उडाला असल्याचे म्हणत सुरक्षा व्यवस्थेची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व नगरपंचायतच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुक जाहीर झाल्यापासुन उमेदवारी अर्ज भरणे, काढणे व इतर सर्व कार्यक्रमात प्रशासनावर लोकप्रतिनिधी व ठराविक कार्यकर्त्यांचा दबाव, दडपशाही व दादागिरी झाली. निवडणुक चालू असताना भाजपाचे प्रभाग 2 मधील अधिकृत उमेदवार निता अजिनाथ कचरे व पुजा अनिल कचरे यांचा उमेदवारी अर्ज प्रशासनाशी हाताशी धरुन दबाव तंत्राने काढण्यात आला.

प्रभाग 14 मधील उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करुन व आदर्श आचारसंहितेचा भंग करुन राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला दिलेला अनपेक्षीत पाठींबा या सर्व घडामोडी पाहता आमचा प्रशासनावर अजिबात विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे मतदान झाल्यानंतर सील झालेली मतदान यंत्रे किती सुरक्षित ठेवली, त्यासाठी किती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यासाठी लावण्यात आलेली सुरक्षा कशी आहे याची सर्व संपुर्ण माहिती मिळावी व ती प्रसारमाध्यमांवर जाहीर करावी व या सर्व यंत्रणेवर प्रशासनाने कडक लक्ष ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्यासह उमेदवार अश्विनी गायकवाड, गणेश क्षीरसागर, बबनराव लाढाणे, उमेश जपे, मोनिका गदादे, मोहिनी पिसाळ, शरद म्हेत्रे, वनिता शिंदे, संजय भैलुमे, सुवर्णा काकडे, अनिल गदादे, धनंजय आगम यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या