Thursday, April 25, 2024
Homeनगरमतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी

मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. आज गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याचे व तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

- Advertisement -

ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दावे व हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत प्रत्येक मतदाराने आपले नाव आहे किंवा कसे यांची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास नमुना 6 भरून द्यावा, नावाच्या तपशिलात चूक असल्यास नमुना 8 दुरुस्ती अर्ज भरून द्यावा, प्रारूप मतदार यादीतील नावावर आक्षेप असल्यास आक्षेप घ्यावा, मतदारांनी मयत, दुबार, स्थलांतरीत नावे वगळणेसाठी पुढाकार घ्यावा, महिला मतदारांची नाव नोंदणी वाढविणेसाठी सर्व महिला संघटनांनी सहभाग घ्यावा, असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

18 ते 19 वयोगटातील नव मतदारांची नाव नोंदणी साठी कॉलेजचे प्राचार्य यांनी शिबीर आयोजित करावे, नागरिकांच्या सोईसाठी 19 नोव्हेंबर 2022, 20 नोव्हेंबर 2022, 3 डिसेंबर 2022 व 4 डिसेंबर 2022 रोजी मतदार नाव नोंदणी साठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व दिव्यांग यांचे मतदार यादीत नाव नोंदणी साठी 12 व 13 नोव्हेंबर 2022 रोजी व तृतीय पंथी, देहव्यवसाय करणार्‍या महिला, घर नसलेले भटके विमुक्त जमातीचे नागरिक यांचे नाव नोंदणीसाठी 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष शिबीर घेतले जातील.

मतदारांना आता दरवर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार नाव नोंदणी करता येईल. 1 ऑक्टोबर, 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे मतदार नाव नोंदणी साठी आगाऊ अर्ज देऊ शकतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

‘पदवीधर’साठी 80 हजार मतदारांचे अर्ज

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी नगर जिल्ह्यात 80 हजार 342 मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. 18 हजार 995 अर्ज हे ऑनलाईन प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पध्दतीने अशा दोन्ही प्रकारे मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. 61 हजार 347 प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाले. यापैकी 60 हजार 939 अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यापैकी 59 हजार 693 अर्ज पात्र ठरले आहेत. 1 हजार 266 अर्ज अपात्र ठरले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 12 हजार 371 मतदारांची नोंदणी झाली आहे. 18 हजार 995 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या