साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार यांना मिळाले झाडू मारण्याचे काम

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईंच्या शिर्डी नगरीत झाडू मारण्याची संधी सहजासहजी कोणालाही मिळत नाही. बाबांनी हातात झाडू देऊन संस्थानमधील व सभोवतालची झालेली घाण साफ करण्याचे काम दिले असून शैक्षणिक पात्रता लिपीकाची असतानाही स्वच्छता विभागात झाडू मारण्याचे काम मिळाले हे साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार यांचे भाग्य असल्याची बाब काल दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनला.

संस्थानच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असलेल्या विठ्ठल पवार यांनी कामगार नेते असल्याने काही दिवसांपूर्वी साईबांबा संस्थानमधील कामगारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लसीकरण, राखीव बेड, नैसर्गिक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी प्रतिक्रिया संस्थान प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता लोकल चॅनेलला दिली होती. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री. पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यानंतर पंधरा दिवसांच्या आतच श्री. पवार यांची साईआश्रम भक्तनिवासातून उचलबांगडी करून थेट स्वच्छता विभागात रवानगी केली.

यादरम्यान त्यांची साईआश्रम भक्तनिवासात कर्मचारी म्हणून दि. 1 जूनपर्यंत रजा मंजूर असताना अधिकार्‍यांनी कामावर येत नाही म्हणून साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच त्यांच्या घरावर नोटीस लावली होती. शैक्षणिक पात्रता असताना कामगार हितासाठी आवाज उठवला म्हणून विठ्ठलराव पवार यांनी केलेल्या चांगल्या कामाची अशी पावती का? असा सवाल जनसामान्यांतून उपस्थित होत असून साई संस्थानमधील कामचुकार लोकांचीही शैक्षणिक पात्रता तपासून त्या निकषाप्रमाणे त्यांना काम द्यावे, अशी मागणी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे सरकारच्या काळात शैक्षणिक पात्रता लिपीकाची असताना एका सच्चा शिवसैनिकाच्या हातात संस्थानने स्वच्छता करण्यासाठी झाडू दिला ही बाब सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *