Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्याचे कृषी सचिव शेतकर्‍यांच्या बांधावर

राज्याचे कृषी सचिव शेतकर्‍यांच्या बांधावर

उगाव। वार्ताहर

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात येथील श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटास भेट देऊन त्या ठिकाणी गटामार्फत राबवण्यात येणार्‍या सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली. सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि गरज याविषयी डवले यांनी मार्गदर्शन केले. तसेच गटामार्फत उत्पादित करीत असलेल्या भाजीपाला पिकांच्या लागवडीची पाहणी केली.

- Advertisement -

गटाचे अध्यक्ष गणेश चव्हाण व रामेश्वर माळी यांच्या शेतात रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करताना पाहणी केली. रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड, लागवडीचे फायदे तसेच त्यासाठी लागणारे बियाण्याची बचत, होणारे उत्पादनात वाढ याविषयी चर्चा केली. तसेच मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे, सापळा पिके, पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी याविषयी सविस्तर चर्चा केली.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा शेतकर्‍यांनी प्रभावीपणे अवलंब करावा असे आवाहनही केले. डवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मौजे चेहडी येथे सोयाबीन पिकावरील शेतकरी शेतीशाळा वर्गास भेट देऊन सोयाबीन पिकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संजीव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पडवळ, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषी अधिकारी बी.जी. पाटील, पिंपळगावचे मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील, कृषी पर्यवेक्षक गायमुखे, कृषी सहाय्यक धर्माधिकारी आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या