Saturday, April 27, 2024
Homeनगरविसापूर पाणी योजना मुदतीत कार्यान्वित करणार

विसापूर पाणी योजना मुदतीत कार्यान्वित करणार

सुपा |वार्ताहर| Supa

सुपा गावासाठी मंजूर होऊन कासव गतीने काम सुरू असणारीविसापूर पाणी योजना ठरलेल्या कालावधीत पूर्ण करून कार्यान्वित करून असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने करण्यात आला आहे. सुपा गावाला लवकरच मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असा विश्वास प्राधिकरणाचे शाखा अभियंता सतीश बढे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मंजुरीनंतर संथ गतीने काम सुरू असणार्‍या सुपा गावच्या विसापूर पाणी योजनेवर ‘सार्वमत’ने मंगळवारी प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग खडबडून जागे झाले आहे. प्राधिकरणाचे शाखा अभियंता बढे यांनी योजनेच्या प्रगतीविषयी माहिती देताना सांगितले की, विसापूर योजनेच्या पाईपलाईनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच सुपा गाव आणि गावठाण व आजुबाजुच्या वाड्या वस्त्यांवरील पाईप लाईनचीही कामे प्रगतिपथावर आहे. योजनेच्या मुख्य शुद्धीकरण केंद्र खडकवाडी, शहाजापूर रोड टाकी, ईदगाह मैदान टाकीचे काम पुर्णत्वास आहे. काही कारणास्तव कोल्हे वस्ती व पवारवाडी, झाडी वस्तीवर येथे ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध न झाल्याने तेथील काम थांबले आहे. ग्रामपंचायतीने आठ दिवसांत दोन ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या तर येत्या तीन ते चार महिन्यांत या योजनेचे पाणी विसापूरवरून सुपा गावात आणू.

प्राधिकरणाच्या माध्यमातून विसापूर पाणी योजनेचे काम सुरू आहे. सुपा गावातील नागरी वस्तीचा आगामी 30 वर्षांचा आराखडा करून साडेचार लाख लिटर पाणी क्षमतेची 14 कोटी 31 लाख रुपये खर्चाची योजना आकाराला येत आहे. योजनेचे 70 ते 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेत सुपा ते विसापूर असे 24 किलोमीटर अंतर आहे. तसेच मुख्य शुद्धिकरण केंद्राच्या टाकीसह आठ पाणी साठवण टाक्या व शुद्धीकरण केंद्रापासून संपूर्ण पुरवठा पाईपलाईन 24 किलोमीटर असे कामाचे स्वरुप आहे. यातील खडकवाडी, डोंगरेवस्ती, झाडी वस्ती, शहाजापूर रोड व ईदगाह मैदान येथील टाक्यांची कामे पूर्ण झाले आहे. प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीने उर्वरित जागा उपलब्ध करून दिल्या तर आगामी तीन ते चार महिन्यांत ही योजना कार्यान्वित करता येईल, असे बढे म्हणाले. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील आतापर्यंत योजनांचा इतिहास पाहता, हा दावा किती सार्थ ठरणार हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या