Thursday, April 25, 2024
Homeनगरसाथीच्या आजाराने राहाता तालुक्यातील नागरिक त्रस्त!

साथीच्या आजाराने राहाता तालुक्यातील नागरिक त्रस्त!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. सध्या खासगी व सरकारी रुग्णालयांत सर्दी, ताप व खोकला तसेच डोकेदुखीचे रूग्ण दिसून येत आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम की अन्य कारण आहे याबाबत नागरिकांमधून तर्क-वितर्क लावले जात आहे. वेळीच याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे. हिवाळ्याचा अंतिम टप्पा अन् उन्हाळ्याचा प्रारंभ यामुळे सर्वत्र वातावरणात बदल झाला. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असे दुहेरी वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे ताप सर्दी, खोकला, डोकेदुखी याचा त्रास अनेकांना होवू लागला आहे.

वातावरणात धुलिकण!

पाकिस्तानात आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका आपल्या देशालाही बसला. जिल्हा व तालुका याला अपवाद नव्हता. सकाळी काही भागात धुके दिसून आले. दिवसभर वातावरणात गारवा होता. दिवसाही थंडी जाणवत होती. जोराचा वारा आणि त्यात मातीचे धुलिकण दिसून येत होते. असे विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. असे वातावरण राहिल्यास याचा घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहेत.

खसगी व सरकारी रुग्णालयांत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यातच पुन्हा करोनाची तिसरी लाट आली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होत आहे. व्हायरल इन्फेक्शन की करोनाची लक्षणे यामुळे मोठा संभ्रम वाढत आहे. काहींना करोनाची लक्षण असली तरी व्हायरल समजून करोनाचे उपचार न घेतल्यास यातून करोनाचे पेशंट वाढण्याची भिती आहे. सध्या राहाता तालुक्याचा दैनंदिन रुग्ण वाढीत दुसरा क्रमांक आहे. करोनाचे निर्बंध पाळतांना नागरिक दिसत नाही. सरकारने निर्बंध घातले असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, गर्दी करणे हे प्रकार सर्रास दिसून येत आहे. लसीकरणामुळे सौम्य लक्षणे दिसत असली तरी रुग्णवाढ होणे गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणानंतरही दगावत असल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे निर्बंध पाळण्याची गरज आहे. तालुका प्रशासन वेळोवेळी आवाहन करुनही अजूनही नागरिकांमध्ये त्याची गंभिरता दिसत नाही. यामुळे करोना वाढीचा वेग राहाता तालुक्यात इतर तालुक्यापेक्षा जास्त आहे. हीच स्थिती राहिली तर तालुका लॉकडाउन करण्याची भुमिका प्रशासन घेवु शकते.

करोनाची तिसरी लाट जिवावर बेतणारी नसली तरी किरकोळ आजार समजून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करु नये. तसेच व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी गाफील न राहता वैद्यकीय सल्ला घेऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन करोना चाचणी करून घ्यावी. वातावरणात बदल होत आहेत. ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल त्यांनी तपासण्या करुन घेणे, कोविडची तपासणी करुन घ्यावी. जे पॉझिटिव्ह असतील पण लक्षणे दिसत नसतील त्यांनी आयसोलेट व्हावे, लक्षणे असतील त्यांनी अ‍ॅडमिट व्हावे, करोनाचे रुग्ण तालुक्यात वाढत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी.

– डॉ. प्रमोद म्हस्के, तालुका वैद्यकिय अधिकारी

संक्रांतीपासुन ते फेब्रुवारी हा कालावधीत ॠतु संधी काल असल्याने वातावरण बदलते. यात सर्दी, खोकला, ताप, कफ साठणे असे प्रकार होतात. सध्या कोविडची तिसरी लाट असल्यामुळे व्हायरल इन्फेकशन होत आहे. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. आहारात उष्ण पदार्थांचा वापर वाढवावा. गरम पेये वाढवावित. थंड पेये कमी करा. उबदार कपडे वापरावे. प्रवास व गर्दी टाळावी. ज्यांची लस घेणे बाकी असेल त्यांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे.

– डॉ. वैभव मालकर, छाती रोगतज्ञ, राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या