Saturday, April 27, 2024
Homeनगरपोलिसांकडून मार्च एण्ड वसुली मोहीम

पोलिसांकडून मार्च एण्ड वसुली मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्च एण्डला 15 दिवस बाकी राहिले आहेत. पोलिसांनी आपले मार्च एण्ड वसुली टार्गेट पूर्ण करण्यावर भर दिला आहे. शहर वाहतूक शाखेसह तोफखाना, कोतवाली पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणार्‍याविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सिट, लायसन नसलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज सकाळी व सायंकाळी चौकाचौकांत पोलिसांकडून कारवाई मोहीम राबविली जात आहे.

- Advertisement -

पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. पोलिसांना पाहून वाहन चालक पळ काढत आहेत. मार्च एण्डला पोलिसांना वार्षिक टार्गेट पूर्ण करणे आवश्यक असते. वर्षभर कमी अधिक प्रमाणात केलेल्या कारवाया मार्च महिन्यात अधिक जोरात सुरू होतात. सध्या शहर वाहतूक शाखेसह तोफखाना, कोतवाली पोलिसांची वेगवेगळी पथके नाकाबंदी करून कारवाई करत आहेत. शहरातील तोफखाना पोलीस ठाणे समोर, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग, पत्रकार चौक, डिएसपी चौकात, कोतवाली पोलीस ठाणे समोर, मार्केटयार्ड चौक, नेप्ती नाका परिसरात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत आहे.

फॅन्सी नंबर, विना नंबर असलेल्या दुचाकीवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय दुचाकीवर ट्रिपलसिट असलेल्या किंवा लायसन नसलेल्या वाहन चालकाविरूध्द कारवाई केली जात आहे. वाहतूक शाखेकडून वर्षभर अशा कारवाया सुरूच असतात, मात्र मार्च एण्ड असल्याने नेहमीप्रमाणे कारवाईवर जास्त भर देण्यात आला आहे. वाहतूक शाखेबरोबर पोलीस ठाण्यातील पथकही वाहन कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दररोज शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या सर्वच वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झालेल्या वाहन चालकांकडून लोकअदालतमध्ये दंड वसूल करण्यात आला आहे. ट्रिपलसिट, फॅन्सी, विना नंबर प्लेट वाहन चालकावर कारवाईची मोहीम सध्या सुरू आहे.

– राजेंद्र भोसले, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

- Advertisment -

ताज्या बातम्या