Friday, April 26, 2024
Homeनगरबारागाव नांदूरला ग्रामस्थांचा वाळू लिलावाला विरोध

बारागाव नांदूरला ग्रामस्थांचा वाळू लिलावाला विरोध

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ग्रामसभेमध्ये महसूल प्रशासनाचे अधिकारी व तलाठी यांच्यावर अवैध वाळू तस्करी व वाळू लिलावा संदर्भात प्रश्नांचा ग्रामस्थांनी जोरदार मारा केला. अधिकार्‍यांना धारेवर धरून ग्रामस्थांनी वाळू लिलावाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. बारागाव नांदूर येथील दोन्ही गटातील वाळू लिलावाला विरोध झाल्याने महसूल प्रशासन आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

दरम्यान, ग्रामसभेवेळी वाळू लिलावास विरोध होत असताना चांगलाच गदारोळ झाला. बारागाव नांदूर येथील शिवाजी चौक येथे आयोजित वाळू लिलावाच्या संदर्भात आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखाताई देशमुख होत्या. याप्रसंगी मंडलाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी संदिप नेहेरकर यांनी प्रस्ताविकामध्ये वाळू लिलावाची माहिती ग्रामस्थांना दिली. दोन गटामध्ये 55 लक्ष रुपयांच्या वाळू साठ्याच्या लिलावासाठी ग्रामस्थांनी संमती द्यावी, अशी याचना महसूल प्रशासनाकडून करण्यात आली. यावर संतापलेल्या बारागाव नांदूर ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार करीत महसूलचे मंडलाधिकारी सोनवणे व तलाठी नेहेरकर यांची बोलती बंद केली.

तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले, बारागाव नांदूरमध्ये यापूर्वी दोनदा लिलाव करण्यात आले. परंतु शासनाकडून एक पैशाचाही निधी ग्रामपंचायतीला मिळाला नाही. याउलट गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने नदीपात्रालगतच्या विहिरींची पाणीपातळी घटली. प्रशासनाचे अधिकारी लिलाव करून देतात व ठेकेदार रात्रंदिवस वाळू उपसा करून नदीपात्र उजाड करून टाकतात. वाळू लिलावातून शासनाचा व गावाचा लाभ होण्याऐवजी उलट तोटा होतो. त्यामुळे लिलाव होणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर डॉ. ज्ञानेश्वर आघाव यांनी गावातील गाळेधारकांच्या महत्वाच्या प्रश्नासंदर्भात ग्रामसभा घेण्याची परवानगी मागितली. तर करोना पार्श्वभूमीचे कारण देत नकार मिळाला. परंतु वाळू लिलावाला ग्रामसभा घेण्याची परवानगी कशी मिळाली? असे विचारत शासनाला ग्रामस्थांचे हिताचे नव्हे तर वसुलीचे अधिक महत्व असल्याचे सांगत लिलावास विरोध दर्शविला.

विश्वास पवार, नवाज देशमुख, रफिक इनामदार, रियाज देशमुख यांनी लिलावास विरोध असल्याचे समर्थन केले. लिलावास विरोध केल्यानंतर महसूल प्रशासनाचे मंडलाधिकारी सोनवणे यांनी वाळू चोरी होणार नाही, याची जबाबदारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांवर असल्याचे सांगताच उपस्थित ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त केला. महसूलचे अधिकारी व कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेणार का? असे सांगत ग्रामस्थांनी महसूल विभाग जबाबदारी झटकून वाळू धंदे करणार्‍यांबरोबर हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला.

ग्रामसभेसाठी अ‍ॅड.पंढरीनाथ पवार, बाबाभाई इनामदार, उपसरपंच इजाज सय्यद, जिल्लूभाई पिरजादे, बाळासाहेब पवार, किशोर कोहकडे, दिलीप पवार, निवृत्ती देशमुख, गोवर्धन गाडे, योगेश गाडे, कैलास पवार, राजेंद्र गाडे, ग्रामविकास अधिकारी गोसावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या