विखे कारखान्याकडून जैविक खत निर्मिती

लोणी |वार्ताहर| Loni

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस विकास योजना व सुपीक माती समृध्द शेती अभियानाच्या अंतर्गत ‘प्रवरा तेजस प्लस’ या ग्रीन बायोकंपोस्ट खताचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. प्रवरा तेजस प्लस हे जैविक खत कृषि उत्पादनाच्या वाढीसाठी पोषकच ठरेल, असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

सर्व पिकांच्या उच्चतम उत्पादनासाठी एक परिपूर्ण जैविक सेंद्रीय खत म्हणून याचे उत्पादन डॉ. विखे पाटील कारखान्याच्यावतीने करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने जमिनीचा पोत धोक्यात आला आहे. पिकांवरही त्याचा परिणाम होवू लागल्याने उत्पादनही घटले आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी या सेंद्रीय खताचा चांगला लाभ शेतकर्‍यांना होवू शकतो, असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

या खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास तसेच प्रामुख्याने ऊस उत्पादकांना हुमनी अळीचा भेडसावणारा प्रादुर्भाव रोखण्यात मोठी मदत होईल. या खतामध्ये सेंद्रीय घटक मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याने पिकांची निरोगी व जोमदार वाढ होवून रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले हे खत ऊस, द्राक्ष, डाळींब तसेच इतर फळबागा व भाजीपाला उत्पादक शेतकरी वापरु शकतील. अतिशय माफक दरात प्रवरा फळे भाजीपाला सहकारी संस्थेच्यावतीने या खतांची विक्री सुरु करण्यात आली असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक शेतकर्‍यांनी या खताची खरेदी केली.

याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ट्रक्स वाहतुक संस्थेचे चेअरमन नंदू राठी, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्या चेअरमन गिता थेटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे, सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष नाना म्हस्के यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

प्रारंभी चेअरमन गीता थेटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मॅनेजर सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर संचालक विजयराव लगड यांनी आभार मानले. डेप्युटी अनिल विखे यांनी सूत्रसंचालन केले.