Thursday, April 25, 2024
Homeनगरमयत कुर्‍हाडेच्या जखमा या मारहाणीच्याच

मयत कुर्‍हाडेच्या जखमा या मारहाणीच्याच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव येथील बेपत्ता युवक विजय भगवान कुर्‍हाडे याचा मृतदेह गुरूवारी सकाळी नागापूर परिसरात आढळून आला होता. त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह पुणे येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला होता. प्राथमिक अहवालात मारहाणीमुळे जखमा असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले. दरम्यान, अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

- Advertisement -

नागापूर परिसरात युवकाचा मृतदेह आढळला

विजय भगवान कुर्‍हाडे हा मागील सोमवारपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. चार दिवसांपूर्वी गुरूवारी सकाळी कुर्‍हाडे याचा मृतदेह काकासाहेब म्हस्के कॉलेज रोडवर आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

‘त्या’ युवकाच्या मृतदेहाचे पुणे येथे शवविच्छेदन

मात्र, विजयचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनी पुणे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. शुक्रवारी तेथे शवविच्छेदन होऊन प्राथमिक अहवाल पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. उत्तरीय तपासणीसाठी व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. यात मारहाणीमुळे जखमा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. या प्रकरणी आता नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या