Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळा तालुक्यात पशुधनावर ‘संक्रांत’

देवळा तालुक्यात पशुधनावर ‘संक्रांत’

लोहणेर । पंडित पाठक

पशुवैद्यकिय अधिकारी-सेवकांची रिक्त असलेली पदे तसेच औषधांचा सतत जाणवत असलेल्या तुटवड्यामुळे देवळा तालुक्यातील पशुधनावर संक्रांत आली आहे. आजारी असलेले पशुधनाची संख्या उपचाराअभावी दिवसेंदिवस घटत असल्याने पशुपालक हवालदिल झाले असून शासनाने त्वरीत पशुवैद्यकिय अधिकारी, सेवकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.

- Advertisement -

देवळा तालुक्यातील 49 गावात सध्या फक्त तीनच पशुसंवर्धन अधिकारी जनावरांवर होणार्‍या उपचाराचा भार आपल्या खांद्यावर वाहत आहेत. देवळा तालुक्यातील श्रेणी 1 मध्ये 1 व श्रेणी 2 मध्ये 2 असे एकूण तीन पशुसंवर्धन केंद्र तालुक्यात कार्यरत आहेत. श्रेणी 1 मध्ये देवळा, पिंपळगाव वा., मेशी, दहिवड, उमराणे, खर्डा, खांमखेडा येथील पशु केंद्र समाविष्ट करण्यात आले आहेत.

तर श्रेणी 2 मध्ये लोहोणेर, महालपाटणे, भऊर येथील पशु दवाखाने कार्यरत आहेत. श्रेणी 1 मध्ये एकूण सात व श्रेणी 2 मध्ये 3 असे एकूण दहा पशुसंवर्धन कार्यालय सुरू आहेत. यासाठी सात पशुधन विकास अधिकारी पदे मंजूर असले तरी प्रत्यक्षात एक च पशुधन अधिकारी आपल्या खांद्यावर भार वाहत आहे तर सहा पदे रिक्त आहेत. तर पशु पर्यवेक्षक तीन जागांसाठी मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात दोनच पदे भरली आहेत. तर एक पद रिक्त आहे.

तसेच 17 परिचर पदे देवळा तालुक्यात मंजूर असून फक्त 8 कर्मचारी या पदांवर कार्यरत आहेत. प्रामुख्याने देवळा, खर्डे, पिंपळगाव, उमराणे, दहिवड, खामखेडा येथील केंद्रातील एकूण सहा पशुधन विकास अधिकारीपदे, तर भऊर येथील पशुधन पर्यवेक्षक 1 पद रिक्त आहे. तसेच मेशी 2 , खामखेडा 2, उमराणे 1, पिंपळगाव 2, दहिवड 1, देवळा 1 अशी एकूण नऊ परिचर पदे सद्या रिक्त आहेत.

देवळा तालुक्यातील जनतेचा शेती हा मुख्य व्यवसाय असून त्याला जोड धंदा म्हणून शेतकरी वर्गाकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन असून यात प्रामुख्याने बैल, गायी, म्हैस आदींसह पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. आपले पाळीव आजारी अथवा दुखापत ग्रस्त असलेली जनावरे उपचारासाठी डॉक्टरांची वाट पहात शेतकरी वर्ग इकडे-तिकडे घेऊन फिरत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसत आहे. पाळीव व इतर जनावरांवर जाणवत असलेला गोचीड किडीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी गोचीड पावडर शेतकर्‍यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. तर मोठ्या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांना वेळेवर कोणता उपचार मिळणार? असा प्रश्न शेतकरी व पशुधन पाळणार्‍यांना सतावतो आहे.

विशेष बाब म्हणजे जनावरावर उपचारासाठी खरेदी करावयाचे औषधे वर्षातून एकदाच एप्रिलमध्ये खरेदी केली जातात तर तीन टप्प्यात त्यांचे वाटप करण्यात येत असते. सध्या सर्वच पशुसंवर्धन केंद्रावर उपचारासाठी लागणार्‍या औषधांचा तुटवडा जाणवत आहेत. मुळात अपुरा कर्मचारी वर्ग त्यात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने आजारी पशुधन दगावत आहे. या समस्येने सर्वच पशुधन पालक हैराण झाले आहेत.

शेतकरी वर्गाने लहानपणापासून पाळलेली जनावरे आजारी पडल्याने त्यांची उपचाराअभावी तडफड होत आहे. डॉक्टर व औषधेही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आता जनावरे पाळावीत की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पाळीव जनावरांना वेळेवर उपचार व लसीकरण होणे गरजेचे आहे.

रावसाहेब निकम , शेतकरी, विठेवाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या