Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहिनाभरात 4752 वाहन चालकांवर कारवाई

महिनाभरात 4752 वाहन चालकांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मे महिन्यात वाहतूक नियमभंग करणार्‍या एकूण चार हजार 752 वाहन चालकांवर कारवाई करून 26 लाख दोन हजार 800 रुपये दंडाची आकारणी केली आहे. दरम्यान, दंड आकारणी केली असली तरी वाहतुकीचे नियम पाळण्याचे काम वाहन चालकांकडून होताना दिसत नाही.

- Advertisement -

नगर शहरात कायमच वाहतूक कोंडी होत असते. ठिकठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीला नगरकर वैतागले आहेत. बेशिस्त वाहन चालकांचा त्रास सर्वांना भोगावा लागतो. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून चौका-चौकांत नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत आहे. मे महिन्यात पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. वाहतूक नियमभंग करून वाहन चालविणारे एकूण चार हजार 752 वाहन चालकांविरूध्द कारवाई करून एकूण 26 लाख दोन हजार 800 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.

त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट दुचाकी चालविणारे 221, विना सिटबेल्ट एक हजार 824, मोबाईल टॉकींग 104, धोकादायकरित्या माल वाहतूक करणे 373, नंबरप्लेट विषयी अपराध 172, काळी काच 81, वाहतुकीस अडथळा 270, ट्रिपल सिट 327, अवैध प्रवासी वाहतूक 11 व ड्रंक अँड ड्राईव्ह पाच इत्यादी वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या व प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरणारे वाहन चालकाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच सदर वाहन चालक यांच्या वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत, बदलण्यात आलेल्या सायलेन्सरच्या मोठ्या व कर्कश आवाजामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यावर होणार्‍या दुष्परीणामांबाबत व अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत माहिती देवून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

सर्व वाहन चालकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करून आपले वाहन चालवावे. तसेच आपल्या वाहनावर ई- चलनाचा दंड प्रलंबित असल्यास सदर दंडाच्या रक्कमेचा तात्काळ भरणा करावा. अन्यथा पुढील योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

– पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम.

अनपेड चलनाचे 15 लाख वसूल

ई- चलान प्रणालीव्दारे कसुरदार वाहन चालक यांच्याविरूध्द कारवाई केल्यानंतर बरेच वाहन चालक सदर दंडाच्या रक्कमेचा भरणा करीत नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्यात अनपेड दंडाची रक्कम मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व त्यांच्या अंमलदारांनी 1 ते 31 मे 2023 दरम्यान नाकाबंदी करून अनपेड दंडाच्या रक्कमेची वसुली करण्याची मोहीम राबवली. सदर मोहिमेअंतर्गत तीन हजार 145 वाहन चालकांकडून 15 लाख 37 हजार 100 रुपये वसूल केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या