Thursday, April 25, 2024
Homeनगरमहामार्गावरील वाहनातून डिझेल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

महामार्गावरील वाहनातून डिझेल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्या वेळी महामार्गावर थांबलेल्या मालवाहतुक ट्रक चालकास मारहाण करून डिझेल चोरी करणार्‍या मध्यप्रदेश येथील आंतरराज्य टोळी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या टोळीमध्ये सहा चोरट्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह प्लास्टीकचे डिझेलने भरलेले ड्रम पोलिसांनी जप्त केले आहे.

- Advertisement -

राजाराम गंगाराम फुलेरीया (वय 38), धमेंद्र शिवनारायण ऊर्फ शिवलाल सोलंकी (वय 27), राहुल जुगलकिशोर चंदेल (वय 21 रा. रामदुपाडा ता. मोहन वरोदीया, जि. साजापुर, मध्यप्रदेश), अशोक रामचंदर मालवीय (वय 21), गोविंद पिरूलाल मालवीय (वय 30 दोघे रा. सांगवीमाना, ता. जि. साजापुर, मध्यप्रदेश) व अनिकेत राजेश बोरनार (वय 24 रा. उस्थळदुमाला ता. नेवासा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यातील धमेंद्र सोलंकी, अशोक मालवीय, गोविंद मालवीय व राजाराम फुलेरीया हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द नेवासा, सोनई, लोणी, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड, पैठण, नागपूर जिल्ह्यातील कळमना, मौंडा, सोनेर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.

20 जून, 2022 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपासकामी मध्यप्रदेशकडे जात असताना त्यांना वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात मालवाहतूक ट्रकच्या जवळ एक चारचाकी वाहन उभे असताना दिसले. तेथे संशयास्पद हालचाली होत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर चोरटे वाहनासह पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. सदरचे चोरटे पोलिसांचा पाठलाग होत असल्याचे पाहून त्यांच्याकडील वाहन राहुरी-शिंगणापूर रोडवर सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

त्याच दिवशी एमआयडीसी हद्दीत एका ट्रेलर चालकाला मारहाण करून त्याच्या ट्रेलरच्या टाकीमधून डिझेल चोरीचा प्रयत्न झाला होता. सदर ट्रेलर चालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांसह जिल्ह्यात सुरू असलेल्या डिझेल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार संदीप घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप दरदंले, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, उमाकांत गावडे यांच्या पथकाने चोरट्यांना अटक केली आहे.

चांद्यातील वस्तीवर वास्तव्य

अटक करण्यात आलेले पाच चोरटे नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात कैलास दहातोंडे यांच्या वस्तीवर भांडेतत्वावर राहत असल्याची खबर निरीक्षक कटके यांना मिळाली होती. चोरटे त्यांच्या समानाची आवराआवर करून मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दहातोंडे वस्तीवर धडक मारली. पळून जाणार्‍या पाच चोरट्यांना पोलिसांनी दोन किलोमीटरचा पाठलाग करून पकडले.

स्थानिकांचे पाठबळ

या गुन्ह्यात सहावा आरोपी अनिकेत बोरनार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहत्या घरून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून मध्यप्रदेश राज्यातील पाच जणांची टोळी महामार्गावरील मालवाहतुक ट्रकमधून डिझेलची चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. स्थानिकांनी या चोरट्यांना पाठबळ दिल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. आता मात्र बोरनार याच्यासह टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या