Saturday, April 27, 2024
Homeनगरवेदांत देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालाव

वेदांत देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालाव

अकोले |प्रतिनिधी| Akole

पाच वर्षे पूर्ण होऊनही तालुक्यातील उंचखडकच्या वेदांत देशमुख या चिमकुल्याच्या खुनाचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.

- Advertisement -

वेगवेगळ्या 17 पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तपास करूनही आरोपी मोकाट आहेत. मग आरोपीला शासन कधी होणार? असा संतप्त सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नात लक्ष घालावे. म्हणून हा तपास या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी प्रवीणकुमार लोखंडे यांचेकडे पूर्णवेळ देण्यात यावा ,अशी मागणी उंचखडक ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

सध्या या खुनाचा तपास अकोलेचे पोलीस निरीक्षक यांचेकडे असून पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्याशिवाय कोणालाही पूर्णवेळ तपास करू दिला नाही, असा आरोप होत आहे. पाच वर्षे पूर्ण होऊनही या तपासात कोणतीही प्रगती दिसत नाही तसेच त्याची काय सद्य स्थिती आहे? हे पण माहीत नाही.त्यासाठी माहितीच्या अधिकारात विचारले असता तपास चालू आहे, इतकेच उत्तर मिळत आहे. ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून लवकरच ग्रामस्थ गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही भेटणार आहे.

13 ऑक्टोबर 2015 रोजी वेदांत देशमुख हा चिमुकला गावातून गायब झाला. पाच दिवसांनी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यानंतर 2016 मध्ये 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण उंचखडक गावात 5 दिवस बेमुदत उपोषण करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती.

तेव्हा मुख्यमंत्री यांनी या खुनाचा सखोल तपास करण्याच्यादृष्टीने विशेष तपास पथक स्थापन केले होते. तपास योग्य दिशेने चालू असताना हे विशेष तपास पथक बरखास्त करून हा तपास स्थानिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला. नंतर पुन्हा सहा महिन्यांच्या आत अकोले पोलीस स्टेशनकडे हा तपास वर्ग करण्यात आला. सदरच्या तपासातील दिरंगाई पाहता पुन्हा ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन पूर्ण वेळ तपासासाठी पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्याकडे तपास सोपवावा, अशी मागणी केली होती.

तेव्हा पुन्हा एसआयटी स्थापन करण्यात आली.परंतु नंतर पोलीस निरीक्षक यांचेकडून तपास काढून घेतला, पुढील दोन वर्षे त्या तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही व पाच वर्षे होऊनही वेदांत देशमुखला अद्याप न्याय मिळाला नाही. अकोले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाचा कोणताही तपास झालेला नाही.

तपास अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता निवडणूक झाल्यानंतर तपास करतो, असे सांगितले. या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले परंतु अधिकार्‍यांनी फाईल देखील उघडली नाही. कोर्टाने व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगूनही आरोपीची नार्को चाचणी केली नाही. आरोपीला पाठीशी घालण्याचे काम पोलीस करत असल्याची भावना उंचखडकच्या ग्रामस्थांमध्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या 2 वर्षात एकाही अधिकार्‍याने कोणताही तपास केलेला नाही कोर्टाचे आदेश असूनही संशयित आरोपीची नार्को चाचणी झाली नाही. तसेच तपास अंतिम टप्प्यात आल्यानंतर लगेच अधिकारी बदलले जातात.स्वतःला कार्यक्षम म्हणविणार्‍या एकाही अधिकार्‍याने तपास पूर्ण केला नाही. तत्कालीन पोलीस अधिकारी यांना वाचविण्यासाठी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जात नाही.लवकरात लवकर तपास पूर्ण न झाल्यास पोलिसांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उंचखडक ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या