Thursday, April 25, 2024
Homeनगरवावरथ, जांभळी आणि जांभूळबनसाठी पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

वावरथ, जांभळी आणि जांभूळबनसाठी पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील मुळा धरणा पलिकडच्या शेतकर्‍यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, के. के. रेंज, मुळा धरणासाठी जमिनी देऊन जो त्याग केला. त्यामुळे धरणाच्या या पाण्यामुळे साखर कारखानदारी, नगर येथील औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. अशा या वावरथ, जांभळी व जांभूळबन गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुलाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

पूर्वभागातील मुळा धरणाच्या पैलतिरी असलेल्या जांभळी, जांभुळबन व वावरथ या तीन गावच्या लोकांना सर्व प्रशासकीय कामासाठी राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यासाठी त्यांना बोटीचा वापर करावा लागतो. यापूर्वी बोटीचा अपघात झाल्याने काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजही लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मुळा धरणातून त्या तीन गावांना येण्या-जाण्यासाठी पूल असावा, याबाबतची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे हे अनेक वर्षांपासून करीत होते.त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात सुचविले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नास राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर यश आले. तालुक्यात गेली 15 वर्षे विरोधी पक्षाचे आमदार होते. त्याकाळात या भागातील जनतेने त्यांच्याकडे पुलाची मागणी केली होती. मात्र, त्यांना नुसते आश्वासन देण्यापलिकडे काही मिळाले नाही.

विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे आमदार व मंत्री होताच या प्रश्नासाठी चालना मिळाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार म्हणून या तीन गावांच्या पुलाच्या प्रश्नावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वावरथ, जांभळी व जांभूळबन येथील नागरिकांच्या दळणवळणासाठी मुळा धरणातून पूल व्हावा, याबाबत चर्चा केली. पुलाच्या प्रश्नावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा प्रश्न मनावर घेऊन प्राधान्याने पूल करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन पुलाचे काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर ना. जयंत पाटील यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत अधिकारी वर्गाची बैठक घेतली. या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपस्थित राहून अनेक सूचना जलसंपदा विभागास केल्या. या पुलाचे तातडीने सर्वेक्षण करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुळा धरणात हा पूल झाल्यानंतर राहुरी तालुक्यातील या तीन गावांतील रहिवाशांचे दळण वळण सुलभ होणार आहे. तसेच पारनेर तालुक्यातील लगतच्या गावांनाही फायदा होणार आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तीन गावांतील जनतेच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या