वंचित आघाडीचे जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधील विकास निधीचा गैरवापर करणार्‍या आधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्‍यांची त्रयस्थ समिती मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक डॉ. अरुण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, योगेश गुंजाळ, सोमनाथ भैलुमे आदी यावेळी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील सर्व गावांमधील अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द घटकांच्या दलीत वस्ती सुधार योजनासह रस्ते, वीज, पाणीपुरवठा इत्यादी विकास कामासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करणार्‍या सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकार्‍यांची त्रयस्थ समितीच्या मार्फत चौकशी करावी.

त्यात दोषी आढळणार्‍या अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागण्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. परंतु निवेदन देऊनही संबंधितांवर काहीच कारवाई न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषद प्रशासन, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकार्‍यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *