Thursday, April 25, 2024
Homeनगरलागला वणवा अन् अनुभवला ऐकोपा

लागला वणवा अन् अनुभवला ऐकोपा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती. एवढ्यात अचानक हबीबभाईंचा लाऊडस्पीकर वरील आवाज ऐकू आला.

- Advertisement -

वणवा लागलायं.. मदतीसाठी धावा.. तब्बल 25 हून अधिक प्रशिक्षकांनी पडलेली पोती ओली करून वणव्याच्या दिशेने धावले. जमेल तसे ते आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. काही मिनिटात गावातील ज्येष्ठ, युवकांनी हातात ओले पोते घेऊन डोंगरावर धाव घेत काही मिनिटात सारा वणवा विझवला.

गेली 30 वर्षे निसर्गाच्या संगोपनासाठी आणि गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोत्तम योगदान देत आदर्श गाव असा सर्वदूर लौकिक वाढवणार्‍या हिवरेबाजारमध्ये नुकतीच ही घटना घडली. यातून नागरिकांच्या एकोप्याचा प्रत्यय आला. तर प्रशिक्षणार्थींना थेट वणवा विझविण्याचा अनुभव मिळाला. हिवरेबाजारमध्ये राज्यात नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना प्रशिक्षण देऊनअधिक सक्षम करण्यासाठी प्रविण प्रशिक्षकांच्या यशदा मार्फत कार्यशाळा सुरू आहेत.

कार्यशाळेच्या हॉलच्या मागील बाजूच्या डोंगरावर दुपारी 12 च्या दरम्यान शॉर्टसर्किटने अचानक वणवा लागलेला. सामाजिक कार्यकर्ते हबीबभाई सय्यद यांनी पाहिले आणि क्षणार्धात त्यांनी प्रशिक्षण हॉलमधील प्रशिक्षकाना मदतीसाठी येण्याची आव्हान करताच सर्वांनी जमेल तसा वणवा विझविण्यासाठी योगदान दिले. मात्र, वणव्याचा धूर पाहून अवघ्या काही मिनिटात हिवरेबाजार मधील अबालवृध्द यांनी वणवा विझवण्यासाठी दाखवलेली तत्परता पाहून महाराष्ट्रातून आलेले प्रशिक्षक अचंबित झाले.

राज्यभरातून मृद, जलसंधारण, वनीकरण विषयावर तयार होणार्‍या सातारा,कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव, नाशिक, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी गावभेटीतील अनुभवाबरोबर एकजूटीचा प्रत्यय पाहून सार्‍या गावाला सलाम केला.

याच प्रशिक्षणासाठी यशदाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रांजल शिंदे, पोपटराव पवार, प्राचार्य महेंद्र पांगळ (मुरुड),प्राचार्य विजय जाधव (सातारा), जलसंधारणासाठी योगदान देणारे संजय फल्ले (राजगुरूनगर), युवा प्रविण प्रशिक्षक अंबादास खडसण, पाणी फाऊंडेशन शरद भानगडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या