Thursday, April 25, 2024
Homeनगरवांबोरी पाणी योजनेला कार्यारंभाचे आदेश - आ. तनपुरे

वांबोरी पाणी योजनेला कार्यारंभाचे आदेश – आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी व वाड्या वस्त्यांसाठी पिण्याच्या पाणी योजनेस कार्यारंभ आदेश मिळाले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

- Advertisement -

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, वांबोरी व वाड्या वस्त्यांकरिता नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन मिशन योजने अंतर्गत योजनेत समावेश करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या योजनेसाठी दि.11 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रादेशिक प्राधिकरण नाशिक यांच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली होती. दि.11 मे 2022 रोजी या योजनेला 40 कोटी 57 लाख रुपयांची महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभागाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या नवीन योजनेमुळे प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याची तरतूद करण्यात आली असून वांबोरी व वाड्या वस्त्यांवर पूर्ण दाबाने मुबलक शुध्द पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली ही योजना प्रत्यक्षात साकारणार असल्याने वांबोरी व परीसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध नवीन पाणी योजनेची कामे हाती घेण्यात आलेली आहे. यासंबंधीचे प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात दाखल करण्यात आले होते तसेच काही योजनांचे कार्यारंभ आदेश होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन कामे प्रगतिपथावर असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

या योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत स्थानिक तालुका, जिल्हा व नाशिक विभाग तसेच मंत्रालय स्तरावर अधिकार्‍यांच्या विविध बैठका घेण्यात आलेल्या होत्या व येणार्‍या त्रुटी दूर करत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.

योजनेला कार्यारंभ आदेश निघाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे आमदार तनपुरे यांनी नमूद केले. या महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेला आता सुरुवात होणार असल्याने वांबोरी व परीसरातील जनतेने आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या