Friday, April 26, 2024
Homeनगरवांबोरीत पिकांच्या पंचनाम्यासाठी शेतकर्‍यांकडून बेकायदा वसुली - मोरे

वांबोरीत पिकांच्या पंचनाम्यासाठी शेतकर्‍यांकडून बेकायदा वसुली – मोरे

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यात अतीव पावसामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, वांबोरीत पिकांचे पंचनामे करण्यासाठी हेक्टरी 1 हजार 200 रुपये बेकायदा वसुली सुरू असल्याचा आरोप प्रगतिशील शेतकरी के.एन.मोरे यांनी केला आहे. पैसे दिल्याशिवाय पिकांचे पंचनामे होत नसल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन महिन्यांत राहुरी तालुक्यात सरासरीच्या दुपटीने पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी आणि ऊस यासारखी नगदी पिके पाण्यात सडून गेली. तर उसाच्या फडातही कमरेइतके पाणी साचल्याने गळिताला आलेले उसाचे पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली होती. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारी यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यावरून मागील आठवड्यापासून राहुरी तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत.

मात्र, वांबोरी येथे शेतकर्‍यांकडून पंचनामे करण्यासाठी हेक्टरी 1 हजार 200 रुपये वसुली केली जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. वांबोरी येथे मोरे यांची शेती आहे. त्या परिसरातही पंचनामे सुरू आहेत. मागील वर्षी मोरे यांच्यासह लगतच्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले.

अन्य शेतकर्‍यांनी आर्थिक हातमिळवणी केल्याने त्यांची नावे नुकसान भरपाईच्या यादीत झळकली. मात्र, मोरे यांच्यासारख्या काही शेतकर्‍यांनी पैसे न दिल्याने त्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.

याबाबत ना. प्राजक्त तनपुरे यांच्यासह तहसीलदारांकडे तक्रार करणार असून याकडे संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या