Valentine’s Week 2021: आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात

jalgaon-digital
4 Min Read

जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिना सुरु झाला की, प्रेमात असलेल्या तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे. त्यातही व्हॅलेंटाईन हा केवळ एका दिवसापूरता मर्यादीत नसतो तर तरुणाईसाठी तब्बल एक आठवडा उत्सव असतो. कदाचित म्हणूनच हा आठवडा ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणून ओळखला जात असावा. व्हॅलेंटाईन विकमध्ये येणारे ७ दिवस वेगवेगळ्या ७ नावांनी साजरे केले जातात. मात्र व्हॅलेंटाईन वीक साजरा करत असताना त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेणेही गरजेचे आहे.

व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात ?

रोम राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन २६९ च्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन, तुझा चाहता’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे. वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक : जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता डे

७ फेब्रुवारी, रोझ डे (Rose Day)

रोझ डेपासून या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करतात.

८ फेब्रुवारी, प्रपोझ डे (Propose Day)

या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी प्रेम व्यक्त केलं जातं. यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट घेऊन प्रपोज केले जाते.

९ फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day)

आठवड्यातील तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नात्यात कायमच गोडवा टिकून राहावा, यासाठीचं प्रतीक म्हणून या दिवशी प्रेमीयुगुलं एकमेकांना चॉकलेट देतात. तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीला खास चॉकलेट देऊ शकतो.

१० फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day)

प्रेमात असणाऱ्या अनेकांसाठी टेडी म्हणजे अगदी खास. पहिलीवहिली भेटवस्तू म्हणून अनेकांचीच या पर्यायाला पसंती असते. टेडी डे यादिवशी एकमेकांना टेडी गिफ्ट दिले जातात. मुलींना टेडी बिअर आवडतात, या दिवशी टेडी बिअर देऊ आपले प्रेम व्यक्त करु शकतात.

११ फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day)

जीवनात येणाऱ्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ देण्याची वचनं या दिवशी अनेकजण देतात. मुळात या वचनांमागची भावनाच नात्यांना आणखी दृढ बनवते.

१२ फेब्रुवारी, हग डे (Hug Day)

‘हग डे’ म्हणजेच आलिंगन दिवस. या दिवशी एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा देण्यात देतात.

१३ फेब्रुवारी, किस डे (Kiss Day)

नात्याला एका वेगळ्या वळणावर नेणारा किस डे सुद्धा या व्हॅलेंटाऊन वीकमध्ये साजरा केला जातो.

१४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)

व्हॅलेटाईनच्या वीकमधील सर्वांत महत्त्वाचा दिवसम्हणजे १४ फेब्रुवारी! प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा एक स्पेशल दिवस असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा या आठवड्याचा जरी शेवटाचा दिवस असला तरी प्रेमवीरांसाठी त्यानंतरचा प्रत्येक दिवस तितकाच खास असतो. तरूण मुलं -मुली हा दिवस अगदी जल्लोषात साजरा करतात.

आता तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी मस्त प्लॅन करा आणि आपल्या व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक क्षण आपल्या जोडीदारासह संस्मरणीय बनवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *