Thursday, April 25, 2024
Homeनगरठेकेदाराकडून पैसे घेणारांची नावे जाहीर करणार - नगराध्यक्ष वहाडणे

ठेकेदाराकडून पैसे घेणारांची नावे जाहीर करणार – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

पाणीपुरवठा योजनेचे चारवेळा थर्ड पार्टी ऑडिट झालेले असून विजय कन्स्ट्रक्शनकडून कोणकोणत्या

- Advertisement -

आजी-माजी नगरसेवकांनी पैसे घेतले आहेत हे नावासह जाहीर करणार आहे. निसर्ग कन्सल्टंसीची नेमणूक पाणी पुरवठा योजनेच्या देखरेखी साठी करण्यात आली होती.

मात्र ती कोल्हे गटाच्या सोयीची नसल्याने त्यांनी ठराव करून तिला हुसकावून लावली असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपा नगरसेवकांवर आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी वहाडणे म्हणाले, शासकीय आदेशानुसार हॉलमध्ये मिटिंग घ्यायला बंदी असल्याने कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागली. 15 सप्टेंबरची सभा हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी केला. राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष नगरसेवक व सर्व अधिकार्‍यांना ऑनलाईन सभेचे कामकाज बोलणे व्यवस्थित समजत व दिसत होते.

म्हणूनच आम्ही 5 तास चर्चा करून शहर विकासाचे महत्वाचे अनेक विषय सर्वसंमतीने एकमताने मंजूर केले. पण केवळ नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बोलविलेली सभा हाणून पाडायची व कोल्हे यांची शाबासकी मिळवून 5 नं. साठवण तलावाच्या कामात अडथळे आणायचे हेच कुटिल डावपेच कोल्हे गटाने आखले होते.

आरक्षण उठविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय सभेला अवगत करण्यात आले. या विषयात आर्थिक स्वार्थ साधल्याचा आरोप खोटा असून तुमच्याच बबलू वाणीचे 10 एकराचे आरक्षण उठविण्याला बहुमताने मंजुरी तुम्ही का दिली? बबलू वाणी यांनाच विचारा की नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना किती पैसे दिले? क्रीडांगणाची काळजी होती मग वाणी यांचे आरक्षण उठविण्याला तुम्ही संमती का दिली? 65 गुंठे जागेत शहराचे क्रीडांगण होऊच शकत नाही.

त्यासाठी किमान 4-5 एकर तरी जागा लागणार आहे. शहरात अजूनही कित्येक जागा आरक्षण क्रीडांगणासाठी आहे. त्यापैकी प्रशस्त जागा क्रीडांगणासाठी नगरपरिषद घेणार आहे. शहरातील इनडोअर हॉल मैदानावर काही अतिक्रमणे झालेली आहेत. त्यांना नोटीसही दिल्या आहेत. क्रीडांगण व खेळाडूंबद्दल कळवळा दाखविणार्‍यांनी हिम्मत असेल तर बहुमताचा वापर ही अतिक्रमणे काढण्यासाठी करून दाखवावा.

राजकीय नेत्यांच्या जागांवरील आरक्षण काढण्यासाठी पुढे असणारे सुनीता क्षीरसागर, श्री.गिरमे या सामान्य नागरिकांनाच का आडवे येतात? 10-15 वर्षांपूर्वी घेतलेल्या जुन्या घंटागाड्या विकून नवीन घंटागाड्या घेण्याचा विषय समजून न घेता दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या घंटागाड्या विकायला काढल्या अशी बोंब मारणे हा तर मूर्खपणा आहे. उपलब्ध आर्थिक कुवतीनुसार खुले नाट्यगृह नूतनीकरण करण्याचा आमचा मानस असताना. त्यालाही विरोधासाठी विरोध करायचे कारणच काय?

विजय वहाडणे यांच्या दहशतीमुळेच नगरपरिषदेच्या दोन कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या असा भंपक आरोही करण्यात आला. आत्महत्या करणारा रात्रंदिवस कोणत्या वर्तुळात वावरायचा. त्याच्या घरी जाऊन संजीवनीच्या कोणत्या चेल्याने व्याजाचे पैसे वसुलीसाठी दमबाजी केली सर्व शहराला माहित आहे असेही वहाडणे म्हणाले आहे.

ही सभा चालू असतानाच भाजपाचे काही नगरसेवक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व विषयांचे वाचन करणारे उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यावर 2 तास दबाव आणत होते. पण अधिकार्‍यांनी त्यांना नियम सांगून वाटेला लावले, असेही श्री. वहाडणे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या