Friday, April 26, 2024
Homeनगरवडगाव गुप्ता येथील 600 एकर जमीन एमआयडीसीकडे वर्ग

वडगाव गुप्ता येथील 600 एकर जमीन एमआयडीसीकडे वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य मंत्रिमंडळाच्या काल (बुधवार) झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर जमीन एमआयडीसी-फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे, ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खासगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीकरिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते.

या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र, राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असा विश्वास खा. डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खा. डॉ. विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

वडगाव गुप्ता येथील शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या