Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपंचवटीत लस अभावी लसीकरण केंद्रे बंद

पंचवटीत लस अभावी लसीकरण केंद्रे बंद

पंचवटी | Panchvati

सोमवारी लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल असे वाटत असताना पंचवटीतील सर्वच लसीकरण केंद्रावर अत्यल्प लसी उपलब्ध झाल्याने अनेकांना लस न घेता पुन्हा माघारी फिरावे लागले आहे.

- Advertisement -

मंगळवारी लस उपलब्ध होणार असली तरी गेल्या चार दिवसांपासून केंद्रावर परत जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मंगळवारी परीक्षा होणार आहे.

पंचवटी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयासह हिरावाडी, म्हसरुळ, मखमलाबाद, तपोवन, नांदूर या ठिकाणी लसीकरणाचे केंद्र आहेत. गेल्या चार दिवसांपासून लसी उपलब्ध नसल्यामुळे हे केंद्र बंद होते.

सोमवारी लस उपलब्ध होईल असे सांगितले गेले असल्यामुळे अनेकांनी या केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी केली. मात्र, सोमवारी लशींचा पुरेशा साठा केंद्रावर होऊ शकला नाही. त्यामुळे काही केंद्र सुरुच करण्यात आली नाहीत. तर म्हसरुळ, मखमलाबाद या केंद्रावर प्रत्येकी ५० लसी मिळाल्याने तितकेच लसी देण्यात आल्या.

चार दिवसांपासून केंद्रावर येऊनही लस मिळत नसल्याने काही नागरिक अजून किती चकरा मारायच्या असे प्रश्न करीत संताप व्यक्त करीत घरी परत जात होते. मंगळवारी लस उपलब्ध होणार असली तरी गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दी लक्षात घेता अनेकांना पुन्हा लस न घेता परत माघारी जावे लागणार असल्याचे दिसते. लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्याचे अवघड काम येथील कर्मचाऱ्यांवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात सोमवारी कोव्हॅक्सीनचा साठा संपल्याने दुसऱ्यांदा लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना विनालस माघारी जावे लागले आहे. येथील या अगोदर कोविशील्ड या लसीचा साठा संपलेला होता.

कोव्हॅक्सीनचे दुसऱ्यांदा लस घेण्यासाठी येणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येते होते. तो साठा सोमवारी संपला. या रुग्णालयात आता कोविशिल्डचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून येथे कोविशिल्डचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे इंदिरागांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या