लसीकरणामुळे वाचले ८२ वर्षीय आजोबा; स्कोर १५, ना इंजेक्शन, ना ऑक्सिजन ‘आजोबा ठणठणीत’

jalgaon-digital
3 Min Read

भऊर | प्रतिनिधी

राज्यभरात इंजक्शन अन् ऑक्सिजनचा असलेला तुटवडा, त्या अभावी होणारे मृत्यू यामुळे एकूणच भयावह वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र, वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनाने त्यांना गाठलं…

एचआरसीटी स्कोर १५ असताना, यापूर्वीच झालेलं लसीकरण अन् वेळीच उपचारांच्या जोरावर देवळा तालुक्यातील खामखेडा येथील कडू सखाराम आहेर यांनी कोरोनावर अवघ्या आठ दिवसांत मात केली, विशेष म्हणजे किंवा कृत्रिम ऑक्सिजन ची मदत न घेता ते ठणठणीत बरे झाले आहेत.

८२ वर्ष वय असलेल्या आहेर आजोबांनी ५ मार्च रोजी लस घेतली. लसीचा कुठलाही त्रास देखील झाला नसल्याचे आजोबा सांगतात. त्यात नकळत २४ मार्चला आजोबांना कोरोनाची लक्षण दिसून आली. कुटुंबीयांनी कुठलाही उशीर न करता त्यांची टेस्ट केली व टेस्टचा अहवाल पॉजिटीव्ह आला.

एचआरसीटी केल्यावर बाबांचा स्कोर १५ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. दरम्यान आजोबांची तीन मूल, चार सुना, एक नातसून, एक नातू व एक पनतू अशा एकाच घरातील १० कुटुंबीयांचा देखील अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आलेला होता.

यावेळी मात्र आजोबांचा आत्मविश्वास कुटुंबियांना आधार देणारा ठरला. पाच दिवस आजोबांनी दवाखान्यात उपचार घेतल्यावर गृह विलगीकरणात राहण्याचा आग्रह धरला. पुढील तीन दिवस त्यांनी विलगीकरणात राहून घरीच उपचार घेतले.

इतर कुटुंबियांना देखील आधार दिला. आठ दिवसात आजोबा ठणठणीत बरे झाल्याने इतर कुटुंबीयांचा देखील आत्मविश्वास वाढला व पुढील काही दिवसात पूर्ण घर कोरोनामुक्त झाले. आज सर्व आहेर कुटुंबीय शेती व्यवसाय असल्याने शेतात नित्यनियमाने काम करत आहेत.

घरात एकूण ११ कुटुंबियांना कोरोनाची लागण झालेली असतांना, आजोबा व त्यांच्या पत्नी रखमाबाई यांचे दोघांचे लसीकरण झाले होते. यामुळे आजोबांनी अल्पावधीतच कोरोनावर मात केली तर आजीला संसर्ग झाला नाही. त्यामुळे लस घेणं अगदी सुरक्षित असल्याची जनभावना तयार होण्यास आहेर कुटूंबियांचा अनुभव कामी आला आहे.

कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर लसीकरण गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ वारंवार सांगत असतांना देखील, अनेक नागरिक लसीकरणासाठी पुढे येतांना दिसून येत नाहीत. ग्रामीण भागात व त्यात विशेषतः आदीवासी बांधव अजिबातच इच्छुक दिसत नाहीत. त्या सर्व नागरिकांसाठी आहेर आजोबा व आजी यांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

कोविड झाला तरी लस आपल्याला मृत्यूपासून दूर ठेवते याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे वडील आहेत. लसीकरण व वेळीच उपचार घेतल्यामुळे आज माझे वडील कोरोनाला हरवू शकते. म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय लस घेणार आहोत. आपण देखील सर्वांनी आवर्जून लस घ्यावी.

समाधान कडू आहेर, मुलगा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *