Saturday, April 27, 2024
Homeनगररुपवते कुटुंबियांना संस्थेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न अतिशय खेदजनक

रुपवते कुटुंबियांना संस्थेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न अतिशय खेदजनक

अकोले |प्रतिनिधी| Akole

रुपवते कुटुंबियांना संस्थेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न अतिशय खेदजनक असून अकोले तालुका एज्युकेशन संस्थेत विश्वस्त व कार्यकारी समिती निवडीवरून सुरू असलेल्या वादाबाबत जनभावनेचा विचार व्हावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या व प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे की, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1972 साली झाली; कालकथित दादासाहेब रुपवते, कालकथित यशवंतराव भांगरे, कालकथित लालचंदजी शहा, कालकथित बा. ह. नाईकवाडी, डॉ. बी. जी. बंगाळ यांच्या पुढाकाराने आणि असंख्य कार्यकर्ते व सामान्य लोक यांच्या सहकार्यातून झाली. तालुक्यातील वंचितांच्या, बहुजनांच्या मुलांची शिक्षणासाठीची वणवण कमी व्हावी व तालुक्यातच चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची सोय व्हावी हा उदात्त हेतू राहिला.

संस्थेच्या मागील चार दशकांचा प्रवास अनेक पिढ्या घडविण्याचा साक्षीदार आहे. हे सगळं होत असताना सहाजिकच कार्यकर्त्यांची मनं व कुटुंब सुद्धा एकत्रित आली. मी या सगळ्याची काही अंशी साक्षीदार राहिले. त्यामध्ये रुपवते व पिचड कुटुंबियांचा घरोबा हा सर्वश्रूत! कालकथीत दादासाहेबांच्या पुढाकाराने मधुकरराव पिचड राजकारणातही सक्रिय झाले. दादासाहेबांच्या निधनानंतर प्रेमानंद रुपवते यांना व संपूर्ण कुटुंबाला वडीलधारी म्हणून पिचड यांनी साथ दिली. संस्थेच्या रिक्त झालेल्या कायम विश्वस्तपदी बाबुजींची निवड झाली.

गेले वीस-बावीस वर्षे बाबुजींनी तन-मन-धनाने संस्थेची प्रगती व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले. आज त्यांच्या निधनानंतर अपेक्षित होते रूपवते कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्या पदावर संस्थेचे काम करावे. शैक्षणिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये गेली चौदा वर्षे काम करत असल्यामुळे माझ्या मनात देखील ही अपेक्षा होती. पण मागील सात-आठ दिवसांत जे काय घडत आहे ते संपूर्ण तालुका बघत आहे. बाबुजींच्या निधनानंतर संस्थेचे कायम विश्वस्त असलेल्या माजी मंत्री पिचड व ज्येष्ठ नेते सिताराम गायकर यांची वैयक्तिक भेट घेऊनही हे स्पष्ट ही केले होते. पिचड यांची या संदर्भात राजूर येथील त्यांच्या निवासस्थानी चर्चादेखील झाली होती.

उत्कर्षा आपलीच मुलगी आहे, असे म्हणून त्यांनी माझे प्रोत्साहनही वाढवले. तद्नंतरच्या भेटीमध्ये मला संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी त्यांनीच सांगितले. त्याप्रमाणे जुलै 2021 मध्ये मी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांच्याकडे मला अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य करण्याबाबतचा अर्ज पत्र दिले. पुढे संस्थेचे उपाध्यक्ष एम. डी. सोनवणे व सचिव यशवंत आभाळे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या सदस्यत्वाचा फॉर्म देखील मी भरून दिला. माझ्याकडून सदस्य फी घेण्यास दोघांनीही स्पष्ट नकार दिला. तुझी फी आम्ही भरणार, तू काळजी करू नकोस.

पण अचानक काय झाले माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. त्या आजीव सदस्य फॉर्मचे पुढे काय झाले? कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता अचानकपणे झालेले निर्णय मनाला वेदना देत आहे. किमान बोलावून, चर्चा करून निर्णय घेण्यात यावे एवढा हक्क कुटुंबातील या सर्व वडीलधार्‍या माणसांचा नक्कीच आहे, असे मी मानते. पण तसं काहीच घडलं नाही! दादासाहेबांचं नाव कॉलेजच्या एका शाखेला देत असताना झालेला संघर्ष आणि आता बाबुजींनंतर अचानक रुपवते कुटुंबियांना संस्थेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न अतिशय खेदजनक आहे.

ही संस्था फॅमिली ट्रस्ट नाही लिहून दिलेल्या संस्थेच्या घटने प्रमाणे व धर्मादाय आयुक्तांच्या नियमांप्रमाणे चालते याची पूर्ण कल्पना मला आहे. पण सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना काही प्रथा/नियम अलिखित असतात. ज्या कुटुंबानी या संस्थेचा पाया रोवला, संस्थेसाठी कायम मदतीची भूमिका राहिली त्यांना प्रतिनिधित्व न देण्यामागचे कारण काय असू शकते? तालुक्यातील प्रत्येक सुज्ञ माणसाच्या मनात हा विचार येणे सहाजिक आहे. अनेकांचे फोन आले, मेसेज आले पण माझी प्रामाणिक भावना ही आहे की मधुकरराव पिचड यांना कुटुंबप्रमुख मानून काम करत असताना या वयामध्ये दुखवायचं नाही; विविध राजकीय प्रवाहांमध्ये काम करत असलो तरीही.

पण हाच विचार त्यांनी आमच्याबद्दल का केला नाही? याची खंत वाटते. शैक्षणिक पात्रता, योग्यता, सामाजिक-शैक्षणिक कामाचा आवाका या सर्वच बाबतींमध्ये रुपवते कुटुंब कुठं कमी पडले का? अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या नेमणुका-कायम विश्वस्तपदी व संस्थेच्या नवनियुक्त कार्यकारिणी संबंधात तालुक्यातून येत असलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेत या सर्वच निर्णयांवर फेरविचार व्हावा यासाठी मी आग्रही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या