Thursday, April 25, 2024
Homeनगरउस्थळ दुमाला गावात गटारींच्या कामाअभावी सर्वत्र दलदल

उस्थळ दुमाला गावात गटारींच्या कामाअभावी सर्वत्र दलदल

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला तेथे अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा गटारींची कामे करण्यात न आल्याने पावसाचे संपूर्ण पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. सर्वत्र दलदलीचे साम्राज्य पसरल्याने येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने येथील सांडपाण्याच्या नियोजनासाठी अंतर्गत गटारींसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. सुमारे 4160 लोकसंख्या असलेल्या उस्थळ दुमाला येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व अंतर्गत गटारींच्या समस्यांना कायमच तोंड द्यावे लागते.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात सगळीकडे पाण्याचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. गावात सर्वत्र डबक्यात पाणी साठल्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे.

या प्रकारामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने दखल घेऊन सांडपाण्यासह पावसाचे पाणी गावाबाहेर काढण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मागील वर्षी देखील पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यावेळी देखील ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना नुसतीच आश्वासने देण्यात आली.

संपूर्ण वर्षभराची पाणीपट्टी आकारून देखील पाणीपुरवठा वेळेत केला जात नाही. जे पाणी येते ते देखील अत्यंत कमी दाबाने येत असल्याने येथील ग्रामस्थांना विशेषतः महिलांना याचा खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व समस्या ग्रामपंचायतीने त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी वसूल करते मात्र प्रत्यक्षात त्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नाही. मुबलक पाणी असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे जिल्हा परिषद शाळेच्या बोअरवेलचे पाणी आणावे लागते. जितके दिवस पाणीपुरवठा केला जातो फक्त त्याच दिवसांची पाणीपट्टी ग्रामस्थांकडून घेण्यात यावी.

– सुनील सकट, ग्रामस्थ उस्थळदुमाला

गावात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते करण्यात आले. त्याचवेळी रस्त्याच्या दुतर्फा गटारी करणे गरजेचे होते. पावसाचे पाणी तसेच सांडपाण्याचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे संपूर्ण गाव चिखलमय झाले आहे.

– अमोल काळे, ग्रामस्थ उस्थळदुमाला

- Advertisment -

ताज्या बातम्या