Thursday, April 25, 2024
Homeनगरकर्जदारांच्या सह्या नसतानाही इतर खात्यांमध्ये वर्ग झाले पैसे

कर्जदारांच्या सह्या नसतानाही इतर खात्यांमध्ये वर्ग झाले पैसे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पोलीस कोठडीची मुदत 23 जून पर्यंत वाढवून दिल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, कर्जाच्या रकमेच्या गैरवापर करताना सदर रकमा कर्जदाराच्या सह्या नसतानाही इतर खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी संचालकांना अंधारात ठेवून हा प्रकार केला की, संचालकांच्या सांगण्यावरून, याचा तपास आता होणार आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याची तक्रार नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिली होती.

कोतवाली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आरोपी गायकवाडच्या कोठडीतील तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या होत्या. थकीत कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. कर्जाच्या रकमेचा गैरवापर होत असताना व सदर रकमा दुसर्‍या खात्यात वर्ग करताना संबंधित कर्जदाराच्या सह्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे.

कर्मचार्‍यांनी संचालकांना अंधारात ठेवून हा प्रकार केला की, संचालकांच्या सांगण्यावरून याचा तपास पोलीस करणार आहेत. यात संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. या रकमा ज्यांच्या खात्यात वळवण्यात आल्या, त्यांनाही पोलीस तपासाला सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठांना अंधारात ठेवून एवढा गंभीर प्रकार होणे शक्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने या प्रकरणात आता बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांसह संचालक व पदाधिकारीही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या