Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

तौक्ते वादळामुळे आज नंदुरबार शहरासह जिल्हाभरात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. शहादा येथे वादळी वार्‍यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर काही घरांची छपरे उडाली. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पश्चित किनारपट्टीवर वादळाचा धोका वाढू लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठवडयापासून जिल्हयातील वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे मे महिन्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळीवार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. या वादळामुळे काही वृक्ष उन्मळून पडले तर काही घरांची छपरे उडाल्याने नुकसान झाले. दहा ते पंधरा मिनीटे पाऊस झाला.

शहादा

शहादा शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.त्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अचानक आलेल्या वादळात शहरातील मुख्य रस्त्यावरील विकास हायस्कूल जवळ लिंबाचे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले तसेच खेतिया रस्त्यावरील एका दुकानाचे पत्रे उडाले दरम्यान सुदैवाने कुठेही जिवीत हानी झाली नाही.

शहरात सकाळपासूनच उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळ आले. त्यात शहरातील विकास हायस्कूल व पंचायत समितीच्या मधून जाणार्‍या रस्त्यावर लिंबाचे वृक्ष उन्मळून पडले. मुख्य रस्त्यावर पडलेल्या या वृक्षामुळे मुख्य वीज वाहिनी व उपवाहिनीचे तार तुटले.

विद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून वीज वितरण कंपनीचे उप अभियंता तिरुपती पाटील यांना भ्रमणध्वनीने माहिती देताच त्यांनी तात्काळ आपल्या पथकामार्फत वीज जोडणी करून पुरवठा सुरळीत केला. इंजिनियर भरत पाटील यांनी रस्त्यावर उन्मळून पडलेला वृक्ष आपल्या जेसीबी मशीनचा साहाय्याने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता रहदारीस खुला केला. सुदैवाने जनता कर्फ्यू असल्याने रस्त्यावर कुठलीही रहदारी नव्हती. दरम्यान खेतीया रस्त्यावर पालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू आहे त्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडचे वार्‍यामुळे कोसळले. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातही वृक्ष उन्मळून पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या