Saturday, April 27, 2024
Homeनगरनगरच्या दाम्पत्याला कृषी विद्यापीठ हद्दीत लुटले

नगरच्या दाम्पत्याला कृषी विद्यापीठ हद्दीत लुटले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगरच्या दाम्पत्याला मारहाण करून दोघांनी दुचाकीसह मोबाईलची लूट केल्याची घटना नगर मनमाड महामार्गावरील कृषी विद्यापीठ हद्दीत घडली आहे.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षक बजरंग तुकाराम बांदल हे आपल्या पत्नीसमवेत राहुरी तालुक्यातील धामोरी येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. सोमवारी दि. 16 रोजी रात्रीच्या वेळी ते नातेवाईकांसमवेत राहुरीमध्ये जेवणासाठी आले. जेवण आटोपल्यानंतर नगर येथे घरी जात असताना रात्री 10.30 वाजता त्यांना कृषी विद्यापीठ हद्दीत सिमेन प्रकल्प परिसरात बांदल हे लघुशंकेसाठी थांबल्याचे पाहून दुचाकीवर आलेल्या दोघांनी घटनास्थळी दाखल होत मारहाण करण्यास प्रारंभ केला. बांदल दाम्पत्यांना दमबाजी करीत पैशाची मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी पैसे नसल्याचे सांगताच लुटमार करणार्‍यांनी दुचाकी व मोबाईल चोरून नेला आहे.

याबाबत सकाळीच बांदल दाम्पत्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. दुपारच्यावेळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तक्रार जाणून घेतल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, राहुरी हद्दीमध्ये वाढलेली गुन्हेगारी तर दुसरीकडे नगर मनमाड महामार्गावर प्रवाशांच्या लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राहुरी पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस अधिकारी लाभावा, अशी अपेक्षा राहुरीकरांना लागलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या