विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन?; उद्या हाेणार अंतिम निर्णय

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

लांबलेल्या शैक्षणिक वषार्मुळे यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या मंगळवारी ( दि.९) विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यतादेखील आहे.

सर्वच विद्यापीठांना कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी लागली. विद्यापीठाने सुद्धा अंतिम वर्षाच्या व अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली.

ऑनलाइन परीक्षा घेताना सुरुवातीला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला व विद्यार्थ्यांना सुध्दा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, टप्प्याटप्प्याने ऑनलाईन परीक्षेमध्ये सुधारणा झाली. विद्यापीठाने सुद्धा ऑनलाइन परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला.

ऑनलाइन परीक्षा घेतल्यामुळे बहुतांश सर्व परीक्षांचा निकाल एक ते दोन महिन्याच्या आत प्रसिद्ध करणे शक्य झाले. आॅनलाइन परीक्षांमुळे वेळेची बचत होता असून निकालही लवकर लागत आहे.

त्यामुळे विद्यापीठच ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे ७० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील तब्बल सात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास सुमारे ३० ते ३१ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षकांना करावी लागेल. तसेच प्रथम सत्राची परीक्षा संपून द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला अवधी मिळणार नाही. त्यामुळे ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने अधिक कडक प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करून परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *