Saturday, April 27, 2024
Homeनगरअंडरग्राऊंड पुलाखालून जाणार्‍यांना करावी लागते कसरत

अंडरग्राऊंड पुलाखालून जाणार्‍यांना करावी लागते कसरत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नेवासा रोडवरील महाविद्यालयाकडे जाणार्‍या अंडरग्राऊंडखाली नेहमीच पाणी साचलेले असल्यामुळे जाणार्‍या-येणार्‍यांचे खूपच हाल होत आहेत.

- Advertisement -

सदरचे पाणी हे गटारीतून वाहून आलेले दुर्गंधीयुक्त असे पाणी असल्यामुळे त्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. अनेकवेळा मागणी करुनही या पुलाखालील कायमस्वरुपी पाणी काढण्यास नगरपालिका अपयशी ठरली आहे. तरी सदरचे दुर्गंधीयुक्त पाणी तातडीने काढण्याची व्यवस्था करावी; अन्यथा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकेल.

नेवासा रोडवरील अंडरग्राऊंड पुलाखाली नेहमीच पाणी साचले जाते. भीमनगर, सिध्दार्थनगर भागातील गटारीचे पाणी सरळ या पुलाखाली येत असते. सदरच्या पाण्याची विल्हेटवाट इतरत्र लावण्यात यावी. या पुलाच्या पलिकडे महाविद्यालयीन विद्यार्थी, सेंट झेवियर्स, न्यु इंग्लिश स्कूल, सावित्रीबाई फुले विद्यालय, अशी शाळा महाविद्यालये आहेत.

तसेच हॉस्पिटल व सरकारी कामकाजासाठी तहसील व प्रांत कार्यालये आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो. यामुळे या पुलाखालून मोठी वाहतूक होत असते. त्यात अशा प्रकारचे दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्यामुळे या अंडरग्राऊंड पुलाखालून जाणे म्हणजे जिकरीचे झाले आहे.

वाहने जात असताना या पाण्याची दुर्गंधी आणखी वाढतेे. पायी जाणे म्हणजे सर्कसच आहे. शालेय विद्यार्थी पायी जात असल्यास एखादे मोठे वाहन आल्यास दुर्गंधीयुक्त घाण पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडले जाते. घाण पाण्याने कपडे भरले जातात. असे पाणी अंगावर पडल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात तर या पुलाखाली कंबरेएवढे पाणी असते त्यावेळी तर वाहतूक पूर्णपणे बंदच असते. आताही तशीच परिस्थिती झाली आहे. पायी जाण्यासाठी जागाच नसल्याने पलिकडे जाणे शक्य होत नाही. या भागातील गटारींवर धापे टाकले नसल्याने सदरचे पाणी रस्त्यावर येऊन ते पाणी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर जाते.

अशा परिस्थितीत शाळेत अगर महाविद्यालयात जाण्यासाठी खूप लांबवरचा मार्ग अवलंबवावा लागतो. या पुलाखालच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पलिकडे राहणार्‍या नागरिकांंसह तहसील, प्रांत कार्यालयासह रुग्णालयांमध्ये जाणार्‍यांना दुसरा रस्ताच नाही. त्यामुळे या अंडरग्राऊंड पूल हा सर्वांनाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने पुढाकार घ्यावा.

या भागातील नागरिकांची एवढी मोठी अडचण सर्वांनाच माहित असतानाही कोणीही याकडे लक्ष देत नाहीत. पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. पालिकेने या पुलाखालील दुर्गंधी पाण्याची कायमस्वरुपी विल्हेवाट लावावी. तसेच हा रस्ता सर्वांना जाण्या-येण्यासाठी खुला करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या पुलाखाली लाईटची व्यवस्था करावी

या अंडरग्राऊंड पुलाखाली कायमच अंधार असतो. रात्रीच्यावेळी जाणे-येणे तर मुश्किलीचे होऊन जाते. या ठिकाणी रात्रीच्यावेळी अंधार होत असल्यामुळे महिलांना जाणे-येणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे पालिकेने या अंडरग्राऊंडखाली विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या अंडरग्राऊंड पुलाचा बेस कमी असून तो 2 फूट वाढविणे गरजेचे आहे. सध्या या अंडरग्राऊड पुलाखालील नाला पूर्णपणे भरला जात असल्याने या पुलाखाली पाणी साचत आहे. काल सकाळी मोटार बोलावून सदरचे पाणी काढून घेतले. या पुलाखाली कायमस्वरुपी पाणी साचू नये म्हणून रेल्वेच्या अधिकार्‍यांना भेटून या पुलाचा बेस 2 फूटने वाढविण्याबाबत मागणी करणार आहोत. जर त्यांच्याकडून हे काम होणार नसल्यास पालिकेच्यावतीने सदरचे काम करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांच्याकडे मागणी करणार आहे. पावसाळ्यात पाणी उपसण्यासाठी स्वतंत्र मोटर बसविणार आहोत.

– प्रकाश ढोकणे, नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या