Friday, April 26, 2024
Homeनगरउंचखडक येथे बिबट्या जेरबंद

उंचखडक येथे बिबट्या जेरबंद

अकोले |प्रतिनिधी| Akole

गेल्या अनेक दिवसांपासून उंचखडक बुद्रुक व परिसरात मुक्तसंचार करत असलेला बिबट्या गुरुवारी पहाटे जेरबंद झाला आहे. अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. या बिबट्यांनी अनेक शेतकर्‍यांवर रात्री बेरात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता शेतकर्‍यांवर हल्ले केले होते. या परिसरातील अनेक पाळीव प्राणी देखील बिबट्याने फस्त केले आहेत.

- Advertisement -

बिबट्याचा या परिसरात राजरोसपणे वावर असल्यामुळे लहान मुले देखील भयभीत झाले आहेत. याची दखल घेत अगस्ति कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख व उंचखडक बुद्रुकचे उपसरपंच महिपाल देशमुख यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच स्वखर्चाने वनविभागाचा पिंजरा त्यांच्याच वस्तीनजीक आणून लावला होता. गुरुवारी पहाटे दीड वाजता एक बिबट्या या सापळ्यात अडकला. बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याचे समजताच गाव व परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

वनरक्षक सागर देशमुख व काकड यांनी या बिबट्याचा ताबा घेतला व त्याची रवानगी मनोहरपूर रोपवाटिकेत करण्यात आली आहे. हा बिबट्या जेरबंद झाला असला तरीही अद्यापही या परिसरात दोन बिबटे असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.त्यामुळे महावितरण कंपनीने शेतीसाठी पूर्ण क्षमतेने दिवसा विद्युतपुरवठा करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे तसेच ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असतो त्याच ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या