Wednesday, April 24, 2024
Homeनगरअनधिकृत वाळूसाठा आढळल्यास कठोर कारवाई- तहसीलदार हिरे

अनधिकृत वाळूसाठा आढळल्यास कठोर कारवाई- तहसीलदार हिरे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत अनधिकृत वाळूसाठा तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत अनधिकृत वाळूसाठा आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, बांधकामधारक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील अनधिकृत वाळू वाहतूक व चोरी यास पायबंद घालणेसाठी वाहतूक व उत्खनन करणार्‍या वाहनांवर तसेच अनधिकृत वाळू साठ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी महसूल प्रशासनाला दिलेल्या आहेत. सद्या शेजारील वैजापूर, कोपरगाव तालुक्यामध्ये अधिकृत वाळू लिलाव झाले असून तालुक्यातील बांधकामधारक यांना वाळुची आवश्यकता असल्यास लिलावातील वाळू खरेदी करावी.

वाळू खरेदी केल्याच्या पावत्या रितसर जपून ठेवाव्यात. वाळूतस्करांनी चोरी करुन आणलेली वाळू बांधकामधारक तसेच मोठे बिल्डर विकत घेत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी वाळू खरेदी केल्या बाबतच्या पावत्या जपून ठेवाव्यात. संपूर्ण तालुक्यातील शहरांमधील तसेच गावांमधील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमार्फत वाळू साठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. वाळू साठ्याचे ठिकाणी अधिकृत पावती सादर न केल्यास संबंधितांवर पंचनामा करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

राहाता तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व होणारी अवैध वाहतूक तसेच अनधिकृत गौण खनिजांचे केलेले साठे खपवून घेतले जाणार नसून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे वाहनांवर तसेच अनधिकृत गौण खनिज साठ्यांबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच नव्याने आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या