Saturday, April 27, 2024
Homeनगरआठ दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा- ना. विखे

आठ दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा- ना. विखे

लोणी |प्रतिनिधी| Loni

महसूल, कृषी व ग्रामविकास या विभागांनी समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे 30 सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा, खडी क्रशर ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे. अशा सक्त सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिल्या.

- Advertisement -

राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्रवरानगर येथे घेण्यात आली. त्यावेळी ते उपस्थित महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शिकांत मंगरूळे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम, प्रशांत पाटील, फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अनिल नागणे आदी उपस्थित होते. बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी तलाठी, ग्रामसेवक व महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांना पंचनामे करताना उद्भवणार्‍या अडचणी महसूलमंत्र्यांनी जाणून घेतल्या.

ना. विखे पाटील म्हणाले, तूर्तास ई-पीक पाहणीच्या कामापेक्षा पीक पंचनाम्याच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकर्‍यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे.

अनधिकृत वाळू उपसा, खडी क्रशरबाबत कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करा. तसेच फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे, असा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरीच्या तहसीलदारांनी पीक पंचनाम्याच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली. राहाता तालुक्यात साडेआठ हजार हेक्टर क्षेत्राचे 11376 पंचनामे झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी यावेळी दिली.

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील तलाठी यांनी पूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या कारणाने गावात काम करू दिले जात नसल्याच्या माहितीची मंत्री विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेऊन होत असलेल्या त्रासाची माहिती घाबरून दडवून ठेवू नका. वरिष्ठांनी सुध्दा अशा प्रकारांना पाठीशी न घालण्याचे त्यांनी सूचित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या