Friday, April 26, 2024
Homeनगरआमचे बांधकाम अनधिकृत सिद्ध करून दाखवा; अन्यथा मानहानीचा दावा करणार

आमचे बांधकाम अनधिकृत सिद्ध करून दाखवा; अन्यथा मानहानीचा दावा करणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

आमच्यावर बेकायदा बांधकामाच्या केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. संबंधित बांधकाम रितसर परवानगी घेऊनच सुरु केले होते.

- Advertisement -

त्यामुळे नगराध्यक्षांनी आमचे बांधकाम अनधिकृत आहे हे सिध्द करून दाखवावे अन्यथा आम्ही मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक संजय फंड व श्रीनिवास बिहाणी यांनी दिला आहे. अति हुशार नगराध्यक्षांचा अभ्यास कमी असून चार वर्षांचा निष्क्रीय कारभार झाकण्यासाठी खोटा खटाटोप चालविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शहरात विकासकामे करण्यापेक्षा वैयक्तिक आरोप करण्याचा अजेंडा सुरू ठेवला आहे. नगराध्यक्ष म्हणून जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटला परंतु अजूनही त्यांना कामकाज उमजायला तयार नाही, त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेचे लक्ष विचलित करून आपल्या निष्क्रीय कारभारावर पडदा टाकत आहेत. परंतु श्रीरामपूरची जनता हुशार आहे त्याचा अनुभव आदिक कुटुंबियांना यापूर्वीच आला असल्याचे संजय फ़ंड, श्रीनिवास बिहाणी यांनी म्हटले आहे.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या हितापेक्षा विरोधी नगरसेवकांचे उणे-दुणे काढण्यात नगराध्यक्षा आदिक धन्यता मानत आहेत. नगराध्यक्षा आदिक यांनी आमच्यावर केलेल्या बेकायदा बांधकामाच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. संबंधित बांधकाम रितसर परवानगी घेऊनच सुरू केले होते. परंतु नगररचना विभागाने सदर नकाशात काही बदल सुचवले ते बदल करण्यासाठी आम्ही स्वतः बांधकाम पाडले व नव्याने सुरू केले. यामध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही किंवा तसे कुठल्याही कार्यालयाने म्हटले नाही. नगराध्यक्षा आदिक अतिहुशार असल्याने त्यांना बांधकाम अनधिकृत दिसत आहे. ह्याच मुद्यांवर आदिक यांनी आपले बगलबच्चे पुढे करत आमचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी तक्रारी केल्या. परंतु सदरच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे आम्ही अनधिकृत बांधकामे केली हा नगराध्यक्षाचा दावा खोटा ठरला आहे. शहरातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा, ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिग, यासारखे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या नगराध्यक्ष पदाची शक्ती खर्च करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. आता तरी नगराध्यक्षा आदिक यांनी सत्य स्वीकारावे अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे देखील फंड व बिहाणी यांनी म्हटले आहे.

आदिक नावाचा वापर मालमत्ता गोळा करण्यासाठी

नगराध्यक्षा आदिक ह्यांनी जरा आत्मपरीक्षण करावे. आपल्या कुटुंबाचे कुठे काय धंदे आहेत हे बघावं. आपल्या आदिक आडनावाचा उपयोग हा शहर विकासासाठी करण्यापेक्षा मुंबईत मालमत्ता वाढवण्यात करत असल्याचा आरोपही नगरसेवक फ़ंड व बिहाणी यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या