Sunday, May 5, 2024
Homeनगरअघोषित खाजगी शाळांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा

अघोषित खाजगी शाळांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

राज्यातील अघोषित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे, पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी व 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळण्याची मागणी राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आश्वासन देऊनही त्याची पुर्तता होत नसल्याने संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

या मागणीचे निवेदन नगर तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास पालवे, अनिल गायकवाड, विठ्ठलप्रसाद तिवारी, अंबादास मिसाळ, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. राज्यातील अनुदानास पात्र अघोषित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित करणे, अनुदानास पात्र घोषित 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करण्याबाबतचा विषय गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे.

या विषयासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जूनला झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळासमोर कॅबिनेट बैठकीत आपला प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र,गेल्या महिनाभरात सदर विषय मार्गी न निघाल्याने शिक्षकांचा संयम सुटत चालला असून, याबाबतीत शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत. लवकरात लवकर शासनाने शिक्षकांना दिलेले आश्वासन पाळून राज्यातील अघोषित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे, राज्यातील अनुदानास पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी, राज्यातील 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळण्याची मागणी राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या