Friday, April 26, 2024
Homeनगरकडाक्याच्या थंडीतही उंबरे गावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय हवा तापली

कडाक्याच्या थंडीतही उंबरे गावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय हवा तापली

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या उंबरे ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या 21 दिवसांवर येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

त्यामुळे उंबरे गावात राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. काल 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांनीही राजकीय मोर्चेबांधणी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या निवडणुकीत पुन्हा आमने-सामने उभे राहणार असल्याने उंबरे गावातील पाच प्रभागांतील लढती रंगतदार होणार आहेत. थंडीचा कडाका असून उंबरे गावात मात्र, निवडणुकीमुळे राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे.

उंबरे गावाच्या राजकीय घडामोडींकडे राहुरी तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे सतत लक्ष असते. उंबरे गावातील निवडणूक ही राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून गावामध्ये एकमेकांची अडवाअडवी आणि जिरवाजिरवी करण्यासाठी गट स्थापन करून लढवली जाते. या निवडणुकीमध्ये तालुकास्तरावरील पुढारीही मूकसंमती देतात.

कोणालाही साथ देणार नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने गावपातळीवर ही निवडणूक लढवा असा कानमंत्र समर्थक कार्यकत्यार्ंना देण्यात येतो. निवडणूक झाली की प्रत्येकजण तालुका स्तरावर पुन्हा आपापल्या नेत्यांच्या तंबूत परततात. त्यामुळे राजकीय पुढार्‍यांनाही उंबरे गावच्या निवडणुकीचे कोडे आजपर्यंत उलगडलेले नाही. म्हणूनच राजकीयदृष्ट्या तालुक्यामध्ये उंबरे गावचे नाव गाजलेले आहे.

गावातून राहुरी तालुक्यातील राजकीय घडामोडीला वेग दिला जातो. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागते. उंबरे गावची ग्रामपंचायत डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे यांच्या ताब्यात असून निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती.

परंतु ग्रामविकासाच्या भूमिकेसाठी हे दोन नेते एकत्र आले. तर दुसरीकडे डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांनी गावातील नवतरुण व जुन्या पिढीतील राजकीय मंडळी यांना एकत्र घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे हे मात्र, राजकीय अज्ञातवासात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवनाथ ढोकणे पडद्यामागून काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उंबरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष ढोकणे हे तरुण पिढीला बरोबर घेऊन पुन्हा आपला गावामध्ये सवतासुभा निर्माण करत असून तेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. या गावचे तरुण युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. रामकृष्ण ढोकणे यांनी निवडणुकीमध्ये पूर्णतः ताकतीनिशी उतरणार असल्याचे तरुणांना आवाहन केले आहे. त्यामुळे सध्यातरी उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने सर्वच नेत्यांना उमेदवारी देताना खूपच कसरत करावी लागणार आहे.

प्रभागांमध्ये मतदार संख्या पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1394 मतदार, प्रभाग क्रमांक दोनमध्ये 804 मतदार, प्रभाग क्रमांक तीन 1230 मतदार, प्रभाग क्रमांक चारमध्ये 1057 मतदार, प्रभाग क्रमांक पाचमध्ये 759 मतदार असून एकूण मतदार संख्या पाच हजार 244 एवढी आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये तीन उमेदवार निवडणूक लढविणार असून गावामध्ये यात्रेचे स्वरूप सध्यातरी पहावयास मिळते. अनेक उमेदवार कधी गावामध्ये न फिरणारे आज गावामध्ये उमेदवारीसाठी फिरत असल्याचे चित्र समोर येत आहे.

उंबरे ग्रामपंचायतीमध्ये पाच प्रभाग असून या प्रभागांमधून एकूण पंधरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये सात पुरुष, आठ महिला निवडून येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यसंख्येत महिलांचाच वरचष्मा राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या