उजनी योजना श्रेयवादात अडकली

jalgaon-digital
5 Min Read

कोल्हेंकडून उजनी योजना बंद पाडण्याचे पाप

आ. आशुतोष काळे गटाचे बाबुराव थोरात यांचा आरोप

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

माजी आमदारांनी न परवडणारी म्हणून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना बासनात गुंडाळून ठेवली. तीच योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुन्हा सुरू करून या भागातील शेतीला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. मात्र त्यानंतर 2014 ते 2019 पर्यंत ज्यांनी या योजनेकडे ढुंकून देखील पाहिले नाही.

त्यांनीच आमदार आशुतोष काळे यांनी महाप्रयासाने सुरू केलेली उजनी योजना बंद पाडण्याचे पाप केले असल्याची टीका उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, मागील आठवड्यात 2014 पासून बंद पडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावांतील व परिसरातील शेतकर्‍यांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली होती. ही योजना सहा महिन्यांपूर्वीच आ. आशुतोष काळे यांनी सुरू करण्याचे ठरविले होते.

मात्र मागील पाच वर्षांत दुर्लक्षित असलेल्या या योजनेची अनेक ठिकाणी पाईप गळती व पंप हाऊस दुरुस्तीच्या कामामुळे व करोनाच्या महामारीमुळे ही योजना कार्यान्वित होण्यात थोडा उशीर झाला. तरीही ओव्हरफ्लोच्या पाण्यातून या योजनेच्या पाझर तलावात पाणी साचण्यास सुरुवात होऊन परिसरातील शेतकरी आनंदित झाला होता.

मात्र शेतकर्‍यांना झालेला हा आनंद माजी आमदार कोल्हेंना पाहवला नाही. आपले मागील पाच वर्षात या योजनेसाठी योगदान नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अगोदरच कमी झालेली मतदानाची टक्केवारी भविष्यात आणखी घसरणार या भीतीपोटी त्यांनी आपले समर्थक व कर्मचारी पाठवून या योजनेचे वीजपंप बंद करून ज्याप्रमाणे शेतकरी संप मोडून शेतकर्‍यांच्या अन्नात विष कालवले त्याप्रमाणेच आज पुन्हा एकदा उजनी योजना बंद करून त्यांच्या मनात शेतकर्‍यांविषयी किती द्वेष आहे हे दिसून आले असल्याचे बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे.

आ. काळे यांनी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी केलेले प्रयत्न या भागातील शेतकरी जाणून आहेत. आज जरी तुम्ही उजनी चारी योजना बंद करून आम्हा शेतकर्‍यांच्या अन्नात पुन्हा माती कालविण्याच्या केलेल्या प्रयत्नांची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. तुम्ही कितीही ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करा मात्र कोणत्याही परिस्थितीत ही योजना सुरूच राहणार असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

उजनी उपसा योजना चालू केल्याचे नाटक उघड

माजी आ. स्नेहलता कोल्हे गटाच्या सौ. दरेकर यांचा पलटवार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जिरायत भागातील शेतकर्‍यांचा पाटपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली. मध्यंतरीच्या 10 वर्षांच्या काळात माजी आमदार काळे यांनी लक्ष दिले नसल्याने ही योजना रखडली होती. परंतु सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाठपुरावा केला.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. पाणीही योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम केले होते. ही वस्तुस्थिती असताना विद्यमान आमदारांनी निसर्गाच्या कृपेने साठलेल्या पाण्याचा गैरफायदा घेऊन फक्त बटण दाबण्याचा फोटो काढून उजनी उपसा योजना चालू केल्याचे खोटे भासविल्याचा डाव आखला. परंतू त्यांचा हा खोटा डाव उघड झाल्याने त्यांनी माजी आमदार कोल्हे यांनी योजना बंद पाडल्याचा खोटा कांगावा सुरू असल्याचा आरोप धोंडेवाडीच्या सरपंच शोभा ज्ञानेश्वर दरेकर यांनी केला आहे.

जिरायत भागातील जवळके, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, वेस, बहादरपूर, सोयगाव इतर गावांचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सोडविण्याच्यादृष्टीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली. परंतु मध्यंतरीच्या 10 वर्षांच्या काळात मतदार संघाला लाभलेल्या निष्क्रीय आमदारांच्या काळात या योजनेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले.

त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या आनंदावर विरजण पडले होते. परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात माजी आमदार सौ. कोल्हे यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून या योजनेचे पाणी तलावापर्यंत पोहचवले. सध्या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने नौसर्गिकरित्या भरलेल्या साठवण तलावामुळे या साठलेल्या पाण्यावर राजकीय पोळी भाजण्याचे काम विद्यमान आमदार करत आहे.

परंतु या परिसरातील जनता सुज्ञ असून त्यांना सर्व वस्तुस्थिती ज्ञात आहे. त्यामुळे कायमच दिशाभूल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रकार उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित केल्याचे खोटे भासविण्याचा डाव रचला. परंतु त्यांचा हा डाव खोटा असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कोल्हे यांनी योजना बंद पाडण्याचा कांगावा सुरू केला असल्याचेही सौ. दरेकर म्हणाल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *