Saturday, April 27, 2024
Homeनगरठाकरे समर्थकांची महापालिकेत जोरदार घोषणा

ठाकरे समर्थकांची महापालिकेत जोरदार घोषणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज की जय…सरसेनापती बाळासाहेब ठाकरेेंचा विजय असो…पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा विजय असो…उद्धवसाहेब तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है…अशा घोषणांनी गुरुवारी दुपारी महापालिका दुमदुमली. शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, माजीसभागृह नेते गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अन्य नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला व त्यांच्यासमवेतच कायम राहण्याचा निर्धारही केला. दरम्यान, महापौर रोहिणीताई शेंडगे व अन्य काही पदाधिकारीही आमच्यासमवेत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

शिवसेनेचे अनिल शिंदे, योगीराज गाडे, सुभाष लोंढे, संग्राम शेळके व अमोल येवले या पाच नगरसेवकांसह माजी नगरसेवक सचिन जाधव, अनिल लोखंडे तसेच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, काका शेळके, प्रकाश फुलारी, बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक अक्षय उनवणे, त्यांचे वडील भाऊसाहेब उनवणे, रमाकांत (नाना) गाडे आदींनी बुधवारी मुंबईत जाऊन नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे व बंधू रमाकांत गाडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख कदम यांच्या उपस्थितीत महापालिकेतील महापौर शेंडगेंच्या दालनात गुरुवारी विशेष बैठक झाली. यावेळी माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी सभागृह नेते व नगरसेवक गणेश कवडे, केडगावचे नगरसेवक विजय पठारे, प्रशांत गायकवाड, श्याम नळकांडे, दत्ता कावरे तसेच संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर आदींसह अन्य उपस्थित होते. यावेळी पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले गेले. मात्र, यामुळे आता राज्यस्तरीय शिवसेनेत जसे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले, तसे नगर शहरातील शिवसेनेतही शिंदे व ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे तोही एक चर्चेचा विषय झाला आहे.

प्रा. गाडेंनी राजीनामा द्यावा – कवडे

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या मेळाव्यात जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांना, त्या शिंदे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांच्या नादी लागू नका, असे जाहीर आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मुलगा नगरसेवक योगीराज गाडे व बंधू रमाकांत गाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणे पसंत केल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा प्रमुख प्रा. गाडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक गणेश कवडे यांनी यावेळी केली. तसेच प्रा. गाडे यांना भेटून त्यांनाही याचा जाब विचारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

फसवून नेले, आज बोलणार – प्रा. गाडे

माझे बंधू रमाकांत गाडे यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अन्नधान्य वितरण निविदा कामाच्या निमित्ताने बंधू रमाकांत व मुलगा नगरसेवक योगीराज गाडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांना नगरसेवक अनिल शिंदे यांनी फसवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नेले व फोटोला उभे केले, असा दावा जिल्हा प्रमुख प्रा. गाडे यांनी केला. मी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतच आहे व नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासमवेत शुक्रवारी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, याबाबत नगरसेवक योगीराज गाडे यांच्याशी संपर्क साधल्यावर व ते नेमक्या कोणत्या गटात आहेत, हे विचारल्यावर त्यांनी मौन पाळणे पसंत केले. निविदेच्या कामासाठी काकांसमवेत गेलो होतोे व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा विषय असल्याने त्यासाठी निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर सही केली, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या