Saturday, April 27, 2024
Homeनगरउचापती : अति घाई संकटात नेई !

उचापती : अति घाई संकटात नेई !

अहमदनगर| Ahmednagar| संदीप रोडे

अहमदनगर नाव साधं, सरळ, सोप असलं तरी येथील राजकारण बेरकी अन् प्रशासकीय कामकाजही सरधोपट नाही. याचा प्रत्यय नगरीपूत्र दत्ताराम राठोड यांना आता आलाच असेल. स्वजिल्ह्यात मिळालेल्या पोस्टींगने हरखून गेलेले दत्ताराम राठोड यांची ‘छापा-छापी’ची गाडी सुसाट सुटली. स्पीड ब्रेकर पार करत वेग घेतलेल्या या गाडीनेच त्यांना बदलीच्या दरापर्यंत नेले. विश्वासू माणसानेच विश्वासघात केला.

- Advertisement -

जिल्ह्यातील शिरापूर (पाथर्डी) येथील कष्टकरी कुटुंबातून दत्ताराम राठोड पुढे आले, शिकले सवरले अन् मास्तर झाले. धडपडीतून एमपीएससी पास झाल्यानंतर ते डीवायएसपी अन् पुढे एएसपी झाले. नांदेड येथून ते याच महिन्याच्या सुरूवातीला नगरला बदलून आले. मनोज पाटील नावाच्या नव्या दमाच्या एसपींसोबत त्यांची नगर स्वजिल्ह्यात इनिंग सुरू झाली.

एसपी पाटील आजारी रजेवर गेल्यानंतर राठोड यांच्याकडे एसपीचा चार्ज आला. नगरीपूत्र असले तरी दत्ताराम यांनी जिल्हा समजून न घेताच बॅटिंग सुरू केली. अवैध धंद्याची मुस्कटदाबी करण्यासाठी त्यांनी विशेष पथकाची स्थापना केली. मात्र याच पथकाने त्यांचा घात केला अशी चर्चा आता पुढे येवू पाहते. पूर्वोतिहास न पाहताच त्यांनी स्कॉडमध्ये पोलिस कर्मचार्‍यांना नियुक्ती दिल्या अन् पथकाने जुनी उणी-दुणी काढयाला सुरूवात केली.

एसपींचा चार्ज असल्याने अनुभवी अधिकारी काहीच बोलले नाहीत. एव्हाना त्यांचे म्हणणे विचारात घेण्याची तसदीही राठोड यांनी घेतली नाही. ‘मेरी सुनो’ असं त्यांचं वागणं सुरू राहिलं. पथकाने रेड केल्यानंतर गुन्हा दाखल होण्यास होणार विलंब अनेकांना संशयास्पद वाटू लागला. भलेही त्यामागे तांत्रिक अडचणी असतील पण वरकरणी ते संशयाच्या भोवर्‍यात गुंतत गेले.

जुन्यांना विचारात न घेतल्याने ते दुखावले अन् त्यांनी राठोड यांचा ‘कार्यक्रम’ लावला. त्यासाठी पोलीस दलातीलच काही प्यादे हाताशी धरले. ‘घर का भेदी लंका… नुसार राठोड त्यात फसले अन् उचलबांगडीपर्यंत पोहचले.

15 दिवसांचे एसपी असलेले राठोड यांच्या पथकाने या काळात नगर तालुक्यात फटाका गोडावून आणि शहरात डिझेलच्या काळ्या बाजाराचे रॅकेट उघडकीस आणले. हे दोन्ही धंदे बेकायदेशीर असले तरी त्यांना राजकीय आशिर्वाद होता याचा शोध घेण्यात राठोड विसरलेच. यातून त्यांची राजकीय नेत्याशी दुश्मनी सुरू झाली.

अगदी गृहमंत्रालयापर्यंत त्यांचे नाव पोहचले. एक आमदार आणि मंत्रिमंडळातील नेत्यानेही त्यांच्या तक्रारीचे पाढे वाचले. सोबतच चुकांच्या रिपोर्टचा ऑडिओ क्लीपचा सपोर्ट होताच. आता हा सपोर्टचा रिपोर्ट कोणी, कसा पाठविला याचा इतिहास तसा रंजक. पण त्या खोलात जाण्याची गरज आता उरली नाही.

काळ्या डिझेलचे शिंतोडे आपल्या अंगावर उडू नये त्याचा भडका होऊ नये यासाठी ‘भाईं’च्या खास गुरूने राठोड यांची बदली होईल याची फिल्डींग लावली. आमदारांनीही त्याला सहमती दर्शविली अन् राठोड यांची उचलबांगडी झाली. नगरी राजकारण्यांच्या बेरकीपणा अन् पोलिस अधिकार्‍यांचे आपसातील उट्टे राठोड यांना भोवला हे मात्र नक्की !.

राठोड विरोधात सारे

राठोड हे खरे तर नगरीपूत्र म्हणून बरेच वर्षे ते जिल्ह्याबाहेर राहिले. त्यामुळे शिकलेले नगरी डावपेच ते विसरले. पुर्वीसारखंच नगर साधं-सरळ-सोप्पं असेल अशा अर्विभावात ते गेले. पण सगळेच फासे उलटले. राजकारण्यांनी नगरी डावपेच टाकत त्यांना बरोबर बदलीच्या दारापर्यंत नेले. सोबतीला ‘ती ऑडिओ क्लीप’ही होतीच. याशिवाय छापेमारीच्या सुसाट गाडीने दुखावलेले अधिकारीही खतपाणी घालत होते. एकूणच राठोड विरोधात सारे अशी खदखद जिल्हा पोलीस दलात ऐकावयास येत होतीच. अखेर तीच राठोड यांच्या बदलीसाठी कारणीभूत ठरली, हे ‘त्या क्लीपमधून’ समोर आलेच.

15 दिवसांचे एसपी

‘नायक’ मधील एक दिवसांच्या सीएम सारखे दत्ताराम राठोड हे 15 दिवस नगरचे एसपी राहिले. या काळात 21 गुन्हे दाखल करत 27 आरोपींना गजाआड केले. 65 लाखाचा मुद्देमालही जप्त केला. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणार्‍या अण्णा हजारेंच्या जिल्ह्यात राहूनही ते अण्णांच्या भेटीला गेले नाहीत की कोणा राजकारण्यांचे उंबरठेही झिजवले नाहीत. एसपींची पॉवर दाखविण्याच्या नादात त्यांची विकेट ‘घरभेदी’नेच कधी पडली हे त्यांनाही कळले नाही. पण त्यांच्या बदलीमागच्या राजकारणाचे चर्वितचर्वण मात्र आता सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या