Friday, April 26, 2024
Homeनगरपुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यालगतची झाडे जाळून तोडण्याचे प्रकार

पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यालगतची झाडे जाळून तोडण्याचे प्रकार

पुणतांबा (वार्ताहर) – पुणतांबा-श्रीरामपूर या अंदाजे 19 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बाधकाम खात्याच्या हद्दीत असलेली अनेक मोठी झाडे तोडण्याचे प्रकार वाढले असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी याकडे का दुर्लक्ष करतात याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून ही झाडे लावली आहेत. त्यांचे संगोपन करून मोठी केलेली आहेत. आता मात्र ती मोठी झाल्यावर त्याची निगा राखण्या ऐवजी त्यांची सर्रास तोड केली जात आहे. उन्हाळ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाळलेले गवत अगोदर पेटवून दिले जाते. झाडाच्या बुंध्याजवळही जाणून बुजून आग लावली जाते. काही दिवसानंतर झाड्याच्या फांद्या तोडल्या जातात व त्यानंतर झाडाचे मोठे खोड हळहळू तोडले जाते.

- Advertisement -

झाडे तोडण्यासाठी अल्पवयीन मुलांना पुढे केले जाते व त्यांच्याजवळ महिलांना उभे केले जाते. जेणेकरून कोणी विचारले तर महिलांना पुढे करून लहान मुलांना काय कळते अशी सारवासारव केली आहे. सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाळलेली झाडे आहेत. सोसाट्याच्या वार्‍याचे निमित्त करून सरपणासाठी झाडे तोडण्याचे प्रकार सुरु होते. तसेच वार्‍यामुळे पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी झुंबड उडाली होती. खैरी निमगाव ते चितळी रस्त्यावर दुतर्फा असलेल्या अनेक झाडाच्या फांद्या काही जण तोडत होते.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी तातडीने पाहणी करून या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या झाडांची पाहणी करून ज्यांना विभागाच्या हद्दीत असलेली झाडे जाणून बुजून तोडली आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे उन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुणतांबा परिसरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान पुणतांबा-श्रीरामपूर या राज्य मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याची हद्द रस्त्याच्या मध्य भागापासून दुतर्फा 50 फूट आहे. तसा फलक रस्त्यावर अनेक ठिकाणी लावलेला आहे. अतिक्रमण करणारावर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. आता मात्र अनेक जण झाडे तोडून रस्ता अरुंद करत असून त्यावर श्रीरामपूरचे सार्वजनिक बांधकाम विभाग काय ठोस कारवाई करते याकडे रस्त्यालगतच्या अनेक गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या