अवघ्या दोन टक्के शेतकर्‍यांनाच मिळाला खरीप पीक विम्याचा लाभ

jalgaon-digital
2 Min Read

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

सन 2020-21च्या खरीप हंगामातील पीक विमा परतावा तालुक्यातील केवळ 552 शेतकर्‍यांना मिळाला.

उर्वरीत 30 हजारांहून अधिक शेतकरी या रक्कमेपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील पीक विमा भरलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन टक्क्यांहून कमी शेतकर्‍यांनाच विम्याचा लाभ मिळाला असून 98 टक्क्यांहून अधिक शेतकरी वंचित आहेत.

नेवासा तालुक्यात 31 हजार 129 शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण योजनेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी फक्त 552 ऑनलाईनच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा परताव्याची रक्कम मिळाली आहे. या योजनेत सहभाग घेऊन एक कोटी ऐंशी लाख शेहचाळीस हजार रुपये शेतकर्‍यांनी विमा कंपनीला भरलेले आहेत.

विमा कंपन्यांनी अतिवृष्टीत नष्ट झालेल्या पिकाचे नुकसान पीक विमा कंपनीला 72तासांत ऑनलाईन कंपनीचा टोल फ्री क्रमांकवर शेतकर्‍यांनी कळविल्यानंतर पीक विमा परताव्याची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार होती. तशी ऑनलाईनच्या माध्यमातून ज्या शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या, अशाच शेतकर्‍यांना पीक विमा परताव्याची रक्कम बँकेच्या खात्यात जमा झाली. पण पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नव्हता. तर काही कायमस्वरूपी व्यस्त दाखण्यात येत होता.

तालुक्यातील कृषी विभाग खोटी माहिती देते असा आरोप देखील शेतकर्‍यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. पाचेगावात 852 मिमी पाऊस पडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या मोठे नुकसान झाले.त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक विमा परताव्याची रक्कम मिळवून देण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी, तालुका प्रतिनिधी यांनी विमा कंपन्याशी संपर्क साधून शेतकर्‍यांना पीक विमा परताव्याची रक्कम मिळवून द्यावी.

शेतकर्‍यांकडे ज्यादा पैसे झाले म्हणून आम्ही या योजनेत सहभागी झालो नाही तर, आमच्या पिकांचे नुकसान झाल्यावर आम्हाला आमचा मोबदला मिळावा. याकरिता शेतकरी विमा उतरवितो. मग याचा फायदा विमा कंपन्यांनीच घ्यायचा का? योजनेचा खरा फायदा या कंपन्यांनाच होतो हे मात्र सिद्ध झाले आहे. तसे यात तालुका कृषी अधिकारी पासून वरपर्यंत सगळे अधिकारी या कंपन्यांशी हातमिळवणी करतात असा आमचा आरोप आहे.

– हरिभाऊ तुवर जिल्हाध्यक्ष, शेतकरी बळीराजा पार्टी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *