Friday, April 26, 2024
Homeजळगावलौकी नाल्यात 50 कासवांचा मृत्यू

लौकी नाल्यात 50 कासवांचा मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील आसोदा- आव्हाने रस्त्यावर असलेल्या लौकी नाल्यावरील पुलाच्या बाजूने पाईप लाईन टाकत असतांना झालेल्या खोदकाम दरम्यान पाईप लाईन मध्ये काही कासव मृत अवस्थेत तर काही कासव पाईप लाईन खाली दबलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

उष्णतेमुळे किंवा पाण्यात प्रदूषित घटक वाढल्याने कासवांचा मृत्यू झाला असावा. विकासकामे करतांना जैवविविधतेतील लहानात लहान घटकांचा विचार करून मग कामे केली पाहिजे . मोठमोठे यंत्रे वापरून कामे केली जातात. खोदकाम जर मनुष्यबळ वापरून झाले असते तर आज शेकडो कासवांना जीव गमवावा लागला नसता .

- Advertisement -

बाळकृष्ण देवरे , वन्यजीव संरक्षण संस्था

जवळपास 50 कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे वन्यजीव संरक्षण संस्थेची शोध मोहीम सुरु केली आहे. सोमवारी दुसर्‍या दिवशीही 8 कासव मृतावस्थेत आढळून आले आहेत.

पुलाखालून आलेला नाला आणि त्या नाल्याचा दलदलीचा भाग हा त्यांचा अधिवास होता .अनेक वर्षापासून तेथील चिखलात स्वतःला गाडून घेत ते कासव उष्णते पासून स्वतःचा बचाव करत आले आहेत .परंतु पाईप लाईन टाकताना कासव पाईप खाली दाबले गेले .नाल्यातील प्रदूषित पाण्यात अचानक काही विषारी घटक जास्त प्रमाणात वाहून आले असावेत आणि या कासवांचा मृत्यू झाला असावा. या शक्यतेसाठी नाल्याचे पाणी तपासणे आवश्यक आहे .

रवींद्र फालक , मानद वन्यजीव रक्षक

कासवांच्या अधिवसाला बाधा आल्यानेच मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित ठेकेदाराने नाल्याच्या पात्रातील काम तात्काळ पूर्ण करून नाल्याचा मूळ प्रवाह जसा होता तसा सुरळीत करून दिल्यास नाल्याचा मुख्य प्रवाह कायम राहील आणि भविष्यात अजून कासवांचा जीव जाणार नाही.

योगेश गालफडे ,सचिव वन्यजीव संरक्षण संस्था

कासवांच्या मृत्यूप्रकरणी शोध घेण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे , योगेश गालफाडे, प्रसाद सोनवणे, कैलास साळुंखे, या पथकाने रविवार आणि सोमवारी लौकी नाला, आणि पाट चारी भागात 2 किलोमीटर पर्यंत शोध घेतला असता, पुलापासून 50 मिटरच्या अंतरात नाल्याच्या पात्रात झालेल्या खोदकामामुळे कासवांचा अधिवास बाधित झाला . काही कासव त्यांच्या अधिवसाच्या विपरीत दिशेला अडकले आणि आपल्या अधिवासात परत येतांना मातीच्या ढिगार्‍यावरून घसरून काही कासव पाईपांच्या खड्यात पडले . अनेक कासव पाईपखाली दबले गेले .काही कासव पाईप आणि खड्डा यांच्या गॅप मध्ये अडकले . उष्णता आणि भुकेने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या