तुलसी विवाहाची परंपरा; शुभ-मुहूर्त जाणून घ्या इथे

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

प्रत्येकाच्या घरासमोर तुळस लावलेली दिसते. घरातील महिला मनोभावे देवपूजा संपन्न करतेवेळी या तुळसला पाणी घालतात. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारणमहत्त्व आहे…

आपल्याला एखादी गोष्ट देवाला अर्पण करावयाची असल्यास ती तुळस वृंदावनात किंवा तुळसच्या पायाशी वाहतात. असे केल्याने ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते असे समजले जाते.

तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते.

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याची प्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

२६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुलसी विवाह करता येतो. तुलसी विवाहानंतर घरातले शुभकार्य करण्यासाठी सुरुवात होते.

विविधतेने नटलेल्या भारत देशात तुळस पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. यासाठी योग्य ते मुहूर्त ठरवण्यात आले आहेत.

कार्तिकी एकादशी : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०.

– एकादशी प्रारंभ : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२० रोजी मध्यरात्री ०२ वाजून ४३ मिनिटे.

– एकादशी समाप्ती : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे ०५ वाजून १० मिनिटे.

– द्वादशी प्रारंभ : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे ०५ वाजून ११ मिनिटे.

– द्वादशी समाप्ती : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ०७ वाजून ४६ मिनिटे.

आज 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.59 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 पर्यंत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त असून अनेकांनी तुळस पूजन आणि तुळस विवाह कथेची तयारी करून ठेवली आहे.

तुळशी विवाहाचे स्वरूप

या दिवशी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करून त्यामध्ये बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात, ठेवतात.

या नंतर घरातील कर्ती व्यक्ती तुळस तसेच श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना हळद व तेल लावून स्नान घालतो.

या नंतर विष्णूला जागे करून बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.

तुळशीचे कन्यादान करावे. नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.

गोव्यातील उत्सव

गोवा, दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *