Monday, April 29, 2024
Homeनगरट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न फसला

ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न फसला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुण्याकडे जाणार्‍या मालट्रकमधील दोघांना लुटण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी पाठलाग करून तिघा लुटारूंना दुचाकीसह पकडले. विळद (ता. नगर) शिवारात निंबळक बायपास रोडवर गुरूवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली.

- Advertisement -

विष्णु लक्ष्मण ढाकणे (वय 23 रा. येळी, बडेवाडी, ता. पाथर्डी), देवा लहानु बांगर (वय 21 रा. मातकुळी ता. आष्टी, जि. बीड), ऋषी मधुक डहाळे (वय 21 रा. नारायणडोह ता. नगर) अशी पकडलेल्या लुटारूंची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश रमेश गायकवाड (वय 29 रा. ताडगाव ता. कळम, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

उमेश गायकवाड व त्यांचे मित्र राहुल राजु राय (वय 27 रा. झारखंड) हे मालट्रक घेऊन पुण्याकडे चालले होते. गुरूवारी पहाटे तीन वाजता मनमाड रोडने विळद घाट येथून निंबळक बायपासकडे टर्न मारताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकला दुचाकी आडवी लावून आडविले. ट्रकला दगड मारून काच फोडली व तुमच्याकडे काय पैसे असतील ते काढा, असे म्हणताच तेथे एमआयडीसी पोलिसांचे गस्ती पथक दाखल झाले.

पोलिसांना पाहताच लुटारूंनी धूम ठोकली. पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांच्यासह पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाठक करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या