Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगश्रध्दांजली :  शालीन आणि लाघवी गायिका काळाच्या पडद्याआड

श्रध्दांजली :  शालीन आणि लाघवी गायिका काळाच्या पडद्याआड

सुलोचनाबाईंच्या निधनामुळे लावणीविश्‍वात एक कणखर बुरुज ढासळला आहेच, खेरीज एक शालीन आणि लाघवी व्यक्तिमत्त्वही हरपल्याचं मोठं दु:ख आहे. तोंडी प्रणयी, उन्मादक शब्दांमध्ये रचलेली लावणी सादर करत असतानाही त्यांची डोईवर पदर घेतलेली शालीन मूर्ती  डोळ्यासमोरुन जाणारी नाही. कदाचित देवाने लावणीसाठीच त्यांच्या गळ्यातल्या स्वरयंत्राची निर्मिती केली असावी! सुलोचनाताईंनी लावणीसाठी आवाजाचा चपखल वापर करुन घेतला .

   – मधुरा कुलकर्णी

कोणतीही कला कधीच कोणा एकाच्या मालकीची नसते, मात्र काहींचा ठसाच इतका अमीट असतो की कदाचित त्या त्या कलेतलं एक प्रशस्त दालन त्या व्यक्तिमत्त्वाच्या नावावर होऊन जातं. त्यातील द्वैत कधी संपतं हे कदाचित कला आणि कलाकार यांनाही समजत नसावं! अर्थातच इथे भावनेचा भर म्हणून आपण कलेला मानवी भावनांचा कंगोरा देतो, पण खरंचच कधी तो लाभला तर ती कलाही आपल्या या साधकांचा सहवास सोडू इच्छिणार नाही… पण निसर्गनामक शक्ती या सगळ्या भावभावनांपेक्षा मोठी आहे. म्हणूनच ती कला आणि कलाकाराची फारकत करते आणि अतिशय निर्दयतेने चाहते आणि कलाकारामध्ये काळाचा पडदा टाकते.

- Advertisement -

प्रख्यात लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाच्या वार्तेने प्रत्येक लावणीरसिक ही मनोवस्था अनुभवत असेल. गेली काही दशके हे नाव लावणीविश्‍वाला अधिकाधिक सुशोभित आणि बलवान करत होतं. ‘फड सांभाळ तुर्‍याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ सारख्या त्यांच्या अनेक प्रसिद्ध लावण्या आजही प्रत्येक डान्स शोमध्ये ऐकायला मिळतात. अत्युच्च कलाविष्काराने पद्मश्री मिळवणारी ही मनस्वी कलावंत आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या रुपाने लावणीविश्‍वात एक कणखर बुरुज ढासळला आहेच, खेरीज एक शालीन आणि लाघवी व्यक्तिमत्त्वही हरपल्याचं मोठं दु:ख आहे. तोंडी प्रणयी, उन्मादक शब्दांमध्ये रचलेली लावणी सादर करत असतानाही त्यांची डोईवर पदर घेतलेली शालीन मूर्ती  डोळ्यासमोरुन जाणारी नाही.

कदाचित देवाने लावणीसाठीच त्यांच्या गळ्यातल्या स्वरयंत्राची निर्मिती केली असावी! सुलोचनाताईंनी लावणीसाठी आवाजाचा इतका चपखल वापर करुन घेतला की शृंगारिक, प्रणयारत, काहीशी द्विअर्थी लावणीही त्यांच्या तोंडून वेगळा बाज आणि ठसका घेऊन उतरली. त्यांच्याबरोबरच राजस लावणीचा काळही अस्ताला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

सुलोचनाताईंनी श्यामसुंदर, शमशाद बेगम यांच्याबरोबर गायलेलं ‘सावन का महिना, कैसे जीना’ किंवा गीता दत्तबरोबर गायलेलं ‘चंदा की चॉंदनी है’ अशी हिंदी चित्रपटातील गाजलेली अनेक गीतं लोकप्रिय झाली होती. वसंत देसाई, चित्रगुप्त, श्यामसुंदरसारख्या त्या काळातील प्रसिद्ध संगीतकारांनी त्यांच्याकडून अनेक  गाणी गाऊन घेतली होती. जोडीला मराठी, गुजराथी, एवढंच काय बॅलेसाठीही त्या गात असत.

वसंत पवार यांच्या पहिल्याच संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी सुलोचनाबाईंचा आवाज घेतला आणि त्यांचं सारं जीवनच बदलून गेलं. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला. सुलोचनाबाईंची लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड होणं हा केवळ लावणीचा सन्मान नव्हता तर आयुष्यभर निष्ठेने कलेचा ध्यास घेऊन ती शालीनतेने व्यक्त करणार्‍या एका समर्पित कलावतीचा सन्मान होता.

केवळ स्वरांच्या ओढीने कलेच्या प्रांगणात अवतरलेल्या या कलावतीने अगदी लहान वयातच गायला सुरूवात केली. घरात गाणारे असे कुणीच नव्हते. अभ्यासापेक्षा गाण्यात जास्त रस असलेल्या सुलोचनाबाईंकडे कोणतेही गाणे पटकन उचलण्याची हातोटी होती.

सुलोचनाबाईंनी पार्श्‍वगायन करायला सुरूवात केली तेव्हा लता मंगेशकर आणि आशा भोसले ही स्वरांची वादळे यायची होती. मिळेल त्या गाण्याचे सोने करण्याची अभिजात क्षमता असलेल्या सुलोचनाबाईंनी १९४९ ते१९७५ या काळात किमान सत्तरहून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली.

यामुळेच वसंत पवार यांनी त्यांच्या गळ्यातून लावणीचा आविष्कार घडवला आणि महाराष्ट्राला आपला असा एक खास ठसकेबाज तरीही शालीन असा आवाज गवसला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुर्‍याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या. ‘माझं गाणं, माझं जगणं’ या त्यांच्या आत्मचरित्रातील कितीतरी आठवणी त्यांच्या या संपन्न जगण्याचा पुरावा देतात.

शासनाचा पुरस्कार, ‘मल्हारी मार्तंड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, पी. सावळाराम-गंगाजमना पुरस्कार अशा पुरस्कारांच्या यादीत लता मंगेशकर पुरस्कारानं मोलाची भर घातली आहे.

‘कृष्णसुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम मराठी गाणे गायले. या चित्रपटाच्या श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीत दिग्दर्शकांच्या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. संगीताचे कोणतेही शिक्षण नसताना आवड म्हणून सुलोचना चव्हाण संगीत क्षेत्राकडे वळल्या. कोणत्याही गुरूच्या तालमीत तयार नसताना त्यांच्याकडे देण्यात आलेल्या गाण्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्या गाण्याचा ताल, शब्द सर्व समजून घ्यायच्या. प्रत्येक तालमीच्या वेळी ते संगीतकाराकडून समजून घेण्याकडे त्यांचा विशेष कल होता.

मराठीबरोबरच त्यांनी अनेक हिंदी, पंजाबी आणि गुजराती गाणीही म्हटली. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न झालं. विशेष म्हणजे श्यामरावांनाही संगीताची आवड होती. संगीत शिक्षण घेतलेलं नसताना कुठलं गाणं कसं म्हणायचं, कुठल्या जागी शब्द तोडायचे, गाण्याची तान कशी घ्यायची याची माहिती त्यांना होती. सुलोचना यांना शब्दांचे अर्थ समजून लावणी कशी गायची याचं शिक्षण श्यामराव चव्हाण यांनीच दिलं.

सुलोचना ताईंनी लावणीमधला ठसका आणि रुबाब बरोबर समजून घेतला आणि काही वर्षांमध्येच त्या लावणीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या. आचार्य अत्रे यांनी सर्वप्रथम दिलेली ‘लावणी सम्राज्ञी’ ही उपाधी त्यांनी आयुष्यभर सांभाळली. ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्या काळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकण्याजोगी झाली. संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिलं गाणं गायल्या.

तो चित्रपट हिंदी भाषेतला होता आणि चित्रपटाचं नाव होतं, ‘कृष्ण सुदामा’. सुलोचनाबाईपहिलं गाणं  गायल्या, तेव्हा त्यांचे वय अवघे नऊ वर्षे होते. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर काम केलं. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या ‘भोजपुरी रामायण’ गायल्या होत्या.

त्यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचं गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली.

गायलेल्या गाण्यांनी, विशेषतः लावण्यांनी सुलोचनाताईंना जनमानसात मानाचं स्थान मिळालं. लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळे टिकून राहिली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझे गाणे, माझे जगणे’ हे आत्मचरित्र लिहिलं असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यात आहेत. सुलोचनाबाईंच्या लावणीवर पडद्यावर विठा भाऊ मांग नारायणगावकर नाचल्या होत्या. लावणीचे बोल होते, ‘गत न्यारी प्रेमाची गत न्यारी.’ इतर भाषांमधली गाणी गाताना सुलोचनाबाई भाषेतले बारकावे आणि ढंग समजून घेत.

VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

- Advertisment -

ताज्या बातम्या