जिल्हा वेतन पथकाचा भोंगळ कारभार

jalgaon-digital
2 Min Read

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांचे वेतन व भविष्यनिर्वाह निधीबाबत कार्यवाहीसाठी नियुक्त असलेले वेतन पथक कार्यालयाचा भोंगळ कारभारच्या विरोधात शिक्षक सेना बोदवड तालुकाध्यक्ष संदीप तायडे व पदाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची तक्रार नाशिक विभागीय उपसंचालकांकडे केली आहे.

जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना ४ जुलैला ९१ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी पोटी करण्यात आले होते. याच कर्मचार्‍यांच्या खात्यावर पुन्हा २२ रोजी ९१ लाख रुपये जमा करण्याबाबत धनादेश जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्यात आला. जळगाव शहरातील दगडी बँकेतील कर्मचार्‍यांने सदर धनादेश आतील रक्कम एका शिक्षकाच्या खात्यावर जमा करत असताना ही बाब लक्षात आल्याने जिल्हा बँकेत मुख्य शाखेत चौकशी केली असता वेतन पथकामार्फत डबल देयके कोषागारात मंजूर करून ही रक्कम कोणतीही खात्री किंवा तपासणी न करता वेतन पथकातील लिपिक कीर्ती पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, तत्कालीन अधीक्षक स्वाती हवेले यांनी दोन वेळा सदर रक्कम बँकेत जमा केले असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर वेतन पथकाने तातडीने हालचाली सुरू झाल्या व याबाबत बँकेत पत्र देण्यात आले.एकीकडे देशात राज्यात कोरोणा संकटामुळे भीषण आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्य कर्मचार्‍यांचे वेतनासाठी कठीण परिस्थितीतून तरतूद करण्यात येत आहे.

शिक्षक ही याबाबतीत शासनास सहकार्य करत आहेत. अशा परिस्थितीत बेजबाबदार कर्मचारी-अधिकारी दोन वेळा रकमा पारित कसे करतात यामागे संगनमत करून गैरव्यवहार करण्याची योजना असावी असा संशय निर्माण होतो. अशाप्रकारे अनेक बाबतीत आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचार्‍यांच्या खात्यावर ९१ लाख रुपये डबल कसे? जमा केले याची खातरजमा कुणीच का करत नाही एवढी रक्कम संगनमताने गहाळ करण्याचा प्रयत्न तर नसेल ना? अशी शंका व्यक्त होते. म्हणून शिक्षक सेनेने वेतन पथक कार्यालयातील संबंधित कर्मचारी ट्रेझरी कार्यालयातील सबंधित कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकाराबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी व्हावी. अशी मागणी नाशिक विभागीय उपसंचालकांकडे महाराष्ट्र शिक्षक सेना संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष संदीप तायडे, प्रदिप हिरोळे, रवींद्र टोंगळे, प्रविण डांगे, श्री.वन्नेरे यासह पदाधिकारी यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *